रस्ते बांधणी आणि चर खणण्याबाबतच्या तब्बल ६५० कोटींची कामे असलेले प्रस्ताव सदस्यांना मंगळवारी रात्री पाठवून ते बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत गुपचूप मंजूर करण्याचा सत्ताधारी शिवसेना-भाजपचा डाव विरोधी पक्षांनी उधळून लावला.
  बैठकीच्या आदल्या दिवशी रात्री हाती पडलेल्या प्रस्तावांचा अभ्यास करता आलेला नाही, असे कारण पुढे करून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ते रोखून धरले.
मुंबईमधील सात परिमंडळांमध्ये सेवा कंपन्यांसाठी चर खोदण्याची कामे देण्याबाबतचा ३५० कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि रस्ते बांधणीचा २४२ कोटी ७१ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आले होते. प्रत्यक्षात स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी तीन दिवस आधी सदस्यांना कार्यक्रमपत्रिका आणि प्रस्तावांची प्रत दिली जाते. प्रस्तावांचा अभ्यास केल्यानंतर बैठकीत सदस्य आपापली मते मांडत असतात.  
परंतु चर खोदणे आणि रस्ते बांधणीबाबतच्या एकूण ६५० कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव सदस्यांना मंगळवारी रात्री मिळाले. त्यामुळे या प्रस्तावांचा अभ्यास करता आला नाही. परिणामी हे प्रस्ताव राखून ठेवावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर आणि मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली. दोन सदस्यांनी अशी मागणी केल्यानंतर प्रस्तावास मंजुरी देता येत नाही.
तातडीच्या कामांचे प्रस्ताव यापूर्वी अशा पद्धतीने स्थायी समितीपुढे सादर करण्यात अले असून त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे तातडीची असून प्रस्तावांना मंजुरी देणे गरजेचे आहे. त्यामुळे विरोध करू नये, अशी विनंती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे वारंवार विरोधकांना करीत होते. विरोधक विनाकारण विरोध करीत असल्याचा आरोप भाजप गटनेते मनोज कोटक यांनी यावेळी केला.
मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पार्टी आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर यशोधर फणसे यांनी हे प्रस्ताव राखून ठेवले.