गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होऊ नये या उद्देशाने सारी खबरदारी घेण्यात येत असून, मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी रस्त्याचा वापर केला जाणार आहे. तसेच गोवा महामार्गावर पडलेले खड्डे २० ऑगस्टपर्यंत बुजविण्याच्या सूचना राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्ग विभागाला बुधवारी दिल्या आहेत़
याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विचार करण्यात आला. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. या काळात वाहतूककोंडी झालीच तर कशेडी घाटास पर्याय म्हणून महाड-नातूनगर-विन्हेरे या मार्गावरून वाहतूक वळविण्यात येईल. यासाठी हा रस्ता सुस्थितीत ठेवावा, अशी सूचना करण्यात आली. आंबेत-मंडणगड हा आणखी एक पर्यायी रस्ता सुस्थितीत ठेवावा तसेच दक्षिण भारतातून होणारी वाहतूक कोल्हापूर मार्गे वळवावी, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. या काळात अवजड वाहनांना सकाळी ८ ते रात्री आठपर्यंत बंदी असणार आह़े
अनधिकृत बांधकामे हटविणार
वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास हा वडखळ नाक्यावर होतो, असे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून देता, वाहतुकीला अडथळा ठरणारी वडखळ नाक्यावरील अनधिकृत बांधकामे हटवावी, असा आदेशच भुजबळांनी दिला.