सरासरी मूल्यांकनाच्या सूत्रानुसार नववी आणि अकरावीत अनुत्तीर्ण झालेल्या राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळणार असून या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वर्षभरातील आधी झालेल्या परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार करण्यात आले. नववीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा शासनाचा नियम आहे. मात्र सद्य:स्थितीत फेरपरीक्षा लेखी स्वरूपात घेणे शक्य नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे. मात्र, त्याच वेळी सरासरी मूल्यांकनानुसार देण्यात आलेल्या गुणांवरही पालक आणि विद्यार्थी नाराज आहेत.

शाळांनी जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केल्याचे आक्षेपही काही शाळांतील पालकांनी घेतले होते. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधीही न देता दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश नाकारला. विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळावी किंवा त्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी पालकांनी केली होती. यावर आता तोंडी परीक्षा घेण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.

सूचना काय? : अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष बोलवून किंवा दूरचित्रसंवादाच्या (व्हिडीओ कॉन्फरन्स) माध्यमातून शाळांनी तोंडी परीक्षा घ्यायची आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. या परीक्षा ७ ऑगस्टपूर्वी घेण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.