संजय बापट

सचिव, महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीने निघतात, परंतु मुख्य सचिव संजय कुमार यांच्या नियुक्तीचा आदेश मात्र उपसचिवांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला. प्रशासनातील धुसफु सीमुळेच अतिरिक्त मुख्य सचिवांनी स्वाक्षरी करण्याचे टाळल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आक्षेपानंतर मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या मुदतवाढीचा आग्रह सोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवपदी संजय कुमार यांच्या केलेल्या नियुक्तीवरून प्रशासनात नवीन नाराजीनाटय़ सुरू झाले आहे. या पदाचे प्रमुख दावेदार सीताराम कुंटे यांच्या नाराजीमुळे कोंडीत सापडलेल्या सामान्य प्रशासन विभागास अखेर उपसचिवांच्या स्वाक्षरीने मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारांचे नियुक्ती आदेश काढावे लागले.

सचिव किंवा अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सामान्य प्रशासन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीने निघतात. पण मुख्य सचिवपदी संजय कु मार, तर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून अजोय मेहता यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी रात्री उपसचिव सरिता बांदेकर- देशमुख यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले.

मुख्य सचिवपदासाठी सीताराम कुंटे दावेदार होते. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्येष्ठतेला प्राधान्य दिले. संजय कुमार ज्येष्ठ असून यानंतर प्रवीण परदेशी, तर तिसऱ्या क्रमांकावर कुंटे आहेत. नाराजीतूनच कुंटे गुरुवारी मंत्रालयातील कार्यालयात फिरकले नसल्याचे समजते. मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्याने प्रवीण परदेशी केंद्रात प्रतिनियुक्तीसाठी प्रयत्नशील आहेत. पुढील महिन्यात मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया निवृत्त होत असल्याने या पदावर अनेकांचा डोळा आहे.

त्या दिवशी संध्याकाळी उशीरा मुख्यमंत्री कार्यालयाकडून टिप्पणी मिळाली. मी तोवर ऑफिस सोडले होते. आदेश लगेचच काढा अशी सूचना होती. उप सचिव तेव्हा तिथेच होत्या. त्यामुळे त्यांना सांगितले व त्यांनी सही केली. उद्या सकाळपर्यंत थांबा असे म्हटले असते तर माझ्या हेतूविषयी शंका घेतली गेली असती. अनेक वेळा अशा प्रसंगी उप सचिव सही करतात.

– सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव