ड्रीम्स मॉल आग; पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे आदेश

मुंबई : भांडुप येथे ड्रिम्स मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील सनराईज रुग्णालयामध्ये आग लागून शुक्रवारी दुर्घटना घडली. या आगीबाबत सर्वंकष चौकशी करून त्याचा अहवाल पुढील पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या आगीची चौकशी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीत दहा रुग्णांचा मृत्यू झाला. या मॉलमध्ये करोना रुग्णांसाठी तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले होते. अग्निरोधक यंत्रणा नसताना तसेच मॉलमध्ये अनेक त्रुटी असताना त्यात रुग्णालय उभारण्यासाठी परवानगी कशी दिली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दुर्घटनेच्या चौकशीला विशेष महत्त्व आले आहे.

ड्रीम्स मॉल घटनेतील आगीचे नेमके कारण काय, त्याबाबत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत करून कारणांची स्पष्टता करणे. मॉल तसेच त्यातील सनराईज रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व परवानगी देण्यात आल्या होत्या का, त्याची पडताळणी करून, दिलेल्या नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे, अग्निसुरक्षा पालनाबाबतच्या उपाययोजना करण्यात मॉलचे मालक व व्यवस्थापन तसेच रुग्णालयाचे व्यवस्थापन यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या का, ते शोधून काढणे, अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का, त्याची कारणे शोधून काढणे या घटनेच्या अनुषंगाने इतर काही संदर्भित मुद्दे असल्यास ते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य त्या शिफारशी सुचवण्याबाबतही सांगण्यात आले आहे. या सर्व मुद्द्यांचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त चहल यांनी दिले आहेत.

४० तासांनंतर  आगीवर नियंत्रण

ड्रीम्स मॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास लागलेली भीषण आग ४० तासांनंतर पूर्णत: विझली. शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.  या रुग्णालयात ७५ रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोन रुग्ण रोनाने दगावले होते. त्यांचे मृतदेह या आगीत जळाले आहेत, तर अन्य नऊ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. उर्वरित रुग्णांपैकी ४६ रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आले होते, तर २२ रुग्ण दुर्घटनेनंतर घाबरून पळाले होते. त्यापैकी ज्या रुग्णांची प्रकृती स्थिर होती त्यांना घरीच अलगीकरणात राहायला सांगितले आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती त्यांना पालिके च्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

२७ जणांची प्रकृती स्थिर

दुर्घटनेच्या रात्री दोनच्या सुमारास रुग्णांना आणण्यास सुरुवात झाली. हजार खाटांचा एक विभाग रुग्णांनी पूर्ण भरल्यामुळे नवीन विभाग शुक्रवारपासून सुरू करण्यासाठी आम्ही तयार ठेवला होता. त्यामुळे या रुग्णांना लगेचच तेथे दाखल करता आले. रुग्णांना दिलेल्या उपचारांची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. रुग्णांकडून शक्य होईल तितकी माहिती घेऊन तातडीने उपचार करण्यात आले गेले. दोन गंभीर रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य २७ जणांची प्रकृती स्थिर आहे.