दरवर्षी मुसळधार पावसात खड्डेमय होणाऱ्या रस्त्यांमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र यंदा पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रस्ते विभागाला दिले असून यामुळे मुंबईकर यंदाचा पावसाळा खड्डेमुक्त असेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
दर वर्षी पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात येणारी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे अर्धवट राहतात आणि पावसाळ्याच्या तोंडावर ती अर्धवट सोडली जातात. त्यामुळे रस्ता ओबडधोबड होतो. तसेच पावसाच्या तडाख्यात रस्त्याची पार दैना उडते. त्याचा फटका मुंबईकरांना बसतो. त्यामुळे यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश अजय मेहता यांनी दिले आहेत. सध्या मुंबईत २५८ रस्त्यांच्या दुरुस्तीची, तर १०२ नव्या रस्त्यांची कामे सुरू आहेत.

* सध्या रस्त्यांवरील ३० जंक्शनची कामे आणि रस्त्यांची छोटय़ा-मोठय़ा दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
* सुरू असलेल्या ३६६ रस्त्यांच्या कामांपैकी ८७ शहर विभाग, १८० पश्चिम उपनगर, १०९ पूर्व उपनगरातील आहेत.
*आयुक्तांनी दिलेल्या आदेशांमुळे ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी लागतील.
* नव्याने देण्यात आलेल्या ५३९ कार्यादेशांशी संबंधित कामे ही एप्रिल २०१७ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत.
* ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत यासाठी रस्ते खात्याचे प्रमुख आणि उपप्रमुख अभियंता यांना संबंधित विभागाच्या कार्यालयाशी समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.