03 December 2020

News Flash

वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश

अंतरिम जामिनाबाबत मात्र निर्णय लांबणीवरच

शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेले ८१ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांना अंतरिम जामीन देण्याबाबत बुधवारी युक्तिवाद झाला नाही. मात्र विशेष प्रकरण म्हणून विविध वैद्यकीय चाचण्या आणि उपचारासाठी त्यांना तातडीने नानावटी रुग्णालयात हलवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले.

तळोजा कारागृहात राव यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून ते अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्याची आणि तातडीचा जामीन देण्याची मागणी राव यांच्या पत्नी हेमलता यांनी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर बुधवारी याप्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी झाली. त्या वेळी राव यांना नानावटी रुग्णालयात हलवण्याबाबतचा अंतरिम दिलासा देण्यापुरता युक्तिवाद मर्यादित ठेवण्याची सूचना न्यायालयाने केल्यानंतर हेमलता यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी तातडीचा अंतरिम जामीन देण्याच्या मागणीसाठी युक्तिवाद केला नाही. मात्र राव यांना तातडीने नानावटी रुग्णालयात हलवण्याची मागणी करताना त्यांनी राव यांच्या दिवसेंदिवस खालावत जाणाऱ्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीकडे कारागृह प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. हे असेच सुरू राहिले तर राव यांचा कोठडीतच मृत्यू होईल. त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्याची गरज असून, ती तळोजा कारागृह रुग्णालयात नको, असा युक्तिवादही जयसिंग यांनी केला. कारागृह रुग्णालयात अद्ययावत उपकरणे नसल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

जयसिंग यांच्या युक्तिवादाची दखल घेत राव यांची प्रकृती इतकी खालावली होती, तर त्यांना नानावटीमध्ये का हलवण्यात आले नाही, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) केली. एक ८१ वर्षांचा व्यक्ती जवळपास मृत्यूशय्येवर असून, त्यांना गंभीर आजार आहेत. त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे. अशा वेळी आम्ही त्यांच्यावर तळोजा कारागृहातच उपचार करू हे सरकार म्हणू शकते का, असा प्रश्न न्यायालयाने केला. राव यांना नानावटीमध्ये हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच त्यांच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलण्याचे, त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. राव यांना तळोजा कारागृहातून १५ दिवसांसाठी नानावटी रुग्णालयात हलवण्यास राज्य सरकारची काहीही हरकत नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी दिल्यावर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. राव रुग्णालयात असेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची भेट घेऊ देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

१५ मिनिटांत वैद्यकीय तपासणी अशक्य

राव यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्यास अन्य आरोपींमध्ये त्याचा चुकीचा संदेश जाऊन तेही तशी मागणी करतील, असा दावा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केला. त्यावर गेल्या आठवडय़ात नानावटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून १५ मिनिटे तपासणी केली. ती पुरेशी नाही.  राव यांचा कारागृहातच मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न जयसिंग यांनी उपस्थित केला. न्यायालयाने  यांच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवली. १५ मिनिटांमध्ये वैद्यकीय तपासणी होऊ शकत नसल्याचे म्हटले. राव यांना नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले तरी ते ‘एनआयए’च्या कोठडीतच असणार आहेत, असेही न्यायालयाने सुनावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:00 am

Web Title: order to transfer varvara rao to nanavati hospital abn 97
Next Stories
1 ‘दिवेकर आहारसूत्र’ जाणून घेण्याची संधी
2 ‘निरपेक्ष दाता हरपला’
3 भाजप सरकारच्या काळात महावितरण डबघाईला!
Just Now!
X