मेंदूमृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा पुढाकार

मुंबई : मुंबई आणि पुण्यात मेंदूमृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्यास पुढाकार घेतल्याने मुंबईतील हृदयविकार असलेल्या दोन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

कल्याण येथील ३१ वर्षीय तरुण कामावर असताना अचानक उलटी होऊन बेशुद्ध झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मलेरियामुळे त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांसाठी हा खूप मोठा धक्का होता. मात्र तरीही त्यांनी मोठय़ा हिमतीने हृदयासह फुप्फुस, दोन्ही मूत्रपिंडे दान करत चार जणांना जीवनदान दिले.

सांगली येथे राहणारे दादासाहेब पाटील (५६) यांची आठ महिन्यांपूर्वी नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया केली होती. तपासणीदरम्यान त्यांच्या हृदयाचे कार्य केवळ २५ टक्के सुरू होते. करोनामुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. पुढच्या काही महिन्यांत त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. ‘इस्केमिक डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ने ग्रस्त असलेल्या दादासाहेब यांच्या हृदयाची रक्ताभिसरणाची क्षमता कमी होती आणि त्यामुळे त्याची हृदयक्रिया बंद पडण्याच्या बेतात होती. हृदय प्रत्यारोपण हाच या रुग्णाचे आयुष्य वाचवण्याचा एकमेव मार्ग होता. त्याच वेळी कल्याणच्या तरुणाचे हृदय प्रत्यारोपणासाठी प्राप्त झाले. ग्लोबल रुग्णालयातून बेलापूरच्या अपोलो रुग्णालयापर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’द्वारे २५ मिनिटांत हृदय आणले गेले आणि दादासाहेबांवर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. करोना काळात ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक असून यशस्वीपणे पार पडल्याचे रुग्णालयाचे हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले.

२८ वर्षीय तरुणाला जीवदान

पुण्यातील एका व्यक्तीने अवयवदान केल्याने मुंबईतील २८ वर्षीय तरुणावर एचएन रिलायन्स रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. नवी मुंबईचा रहिवासी असलेल्या जेसन क्रॅस्टो या वर्षीच्या मार्च महिन्यात बोटीवर होता. त्यावेळी त्याला खोकल्याची तीव्र उबळ येण्याचा त्रास पहिल्यांदा झाला होता. त्याला व्हायरल मायोकार्डायटिस असल्याचे निदान करण्यात आले. या आजारात विषाणूच्या संसर्गामुळे हृदयातील स्नायूंना सूज येते. त्याला हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. हृदय प्रत्यारोपणासाठी नोंद केल्यावर  दोन महिन्यांतच अवयवदाता मिळाला आणि प्रत्यारोपण करू शकलो, असे रुग्णालयातील हृदयविकार शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अन्वय मुळ्ये यांनी सांगितले.

तरुणाच्या अकाली मृत्यूचा धक्का पचविणे अवघड असते. परंतु यातून सावरत कुटुंबीयांनी अवयवदान केल्याने चार जणांना जीवनदान मिळाले.

– डॉ. प्रशांत बोराडे, ग्लोबल रुग्णालय