|| शैलजा तिवले

राज्यात चार वर्षांत प्रमाण तिपटीहून अधिक; फुप्फुस प्रत्यारोपणाची संख्या नऊवर

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या विविध चळवळींना गेल्या चार वर्षांत काही प्रमाणात यश आले आहे. मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांनी या रुग्णांच्या अवयवदानासाठी संमती दिल्यानंतर गरजू रुग्णांवर केलेल्या अवयव प्रत्यारोपणात जवळपास तिपटीहून अधिक वाढ झाल्याचे २०१८-१९ च्या आर्थिक पाहणी अहवालातून निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले असून फुप्फुस प्रत्यारोपणाची संख्या शून्यावरून नऊपर्यंत पोहोचली आहे.

मुंबईत सहा महिन्यांत ४८ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून २०१८ मध्ये वर्षभरात इतकी प्रत्यारोपणेझाली होती. यात मूत्रपिंड (६६), यकृत (३८), हृदय (११), फुप्फुस (७) आणि स्वादुपिंड (१) यशस्वीपणे प्रत्यारोपित केले आहेत.

२०१७ पासून अवयव प्रत्यारोपणामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. २०१६ साली यकृत आणि मूत्रपिंड यांचेच प्रत्यारोपण केले गेले. २०१६ मध्ये हृदय प्रत्यारोपणही होऊ लागले. २०१७ मध्ये हे प्रमाण १४३ वरून ३५७ वर पोहचले. २०१८ साली मात्र यामध्ये थोडी घट होऊन ते ३४१ वर आले होते. परंतु २०१८-२०१९ मध्ये पुन्हा वाढ झाली असून ३८७ वर पोहचले आहे.

याबाबत फोर्टिस रुग्णालयातील क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, ‘‘अवयवदानाबाबत माहिती लोकांपर्यत पोहचत आहे. त्यामुळे नातेवाईकांकडून सकारात्मक प्रतिसाद नक्कीच मिळत आहे. प्रबोधनामुळे राज्यातील अवयवदानाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढत आहे. जवळपास तामिळनाडू आणि अन्य राज्याच्या बरोबरीने आपल्याकडे अवयवदान केले जात आहे.’’

फुप्फुस प्रत्यारोपणाची प्रक्रिया अवघड असून याचे प्रमाण २०१६ साली शून्य होते. ते उत्तरोत्तर वाढत जाऊन या वर्षी नऊवर पोहचले आहे.

अवयवदानासाठी योग्य व्यक्ती ओळखणे आणि पुढील प्रक्रिया सुरू करणे यावर गेल्या काही वर्षांमध्ये विशेष भर दिला जात आहे. यासोबतच नातेवाईकांचे समुपदेशन करणाऱ्या प्रत्यारोपण समन्वयकांचे प्रशिक्षण आणि याच्या जनजागृतीसाठी प्रादेशिक आणि विभागीय प्रत्यारोपण संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याने हे शक्य झाले आहे. विविध २० सामाजिक संस्थाही यामध्ये सहभागी आहेत.   – डॉ. अ‍ॅसट्रीड लोबो, प्रमुख, प्रादेशिक अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्था (रोटो)