एकटय़ा राहणाऱ्या आजी-आजोबांच्या जीवनात काहीसा आनंद भरण्यासाठी शिवडी पोलिसांकडून मंगळवारी खास आजी-आजोबांसाठी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला. शिवडी पोलीस ठाण्याच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ७० हून अधिक अधिक आजी-आजोबांनी सहभागी होत जुन्या गाण्यांवर ठेका धरला होता.

व्हॅलेंटाइन डे जवळ येताच तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. भेटवस्तूंची देवाणघेवाण करत तरुणाई हा दिवस साजरा करतात. याच दिवसाचे निमित्त साधत शिवडी पोलिसांनी खास आजी-आजोबांसाठी मंगळवारी व्हॅलेंटाइन डेचे आयोजन केले होते.

मुंबई शहरात अनेक वृद्ध दाम्पत्ये एकटीच राहतात. त्यांच्या आयुष्यामध्ये काहीसा आनंद भरण्यासाठी पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुऱ्हाडे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्याचे ठरविले. शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७० ते ८० वृद्ध दाम्पत्ये एकटीच राहतात. त्यांची विचारपूस पोलिसांकडून वेळोवेळी केली जाते. दर दोन दिवसांनी या मंडळींकडे जाऊन पोलीस विचारपूस करतात.

सुरुवातीला केक कापून काही वृद्ध महिलांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. त्यानंतर आजोबांनी आजींना हृदयाच्या आकाराचे फुगे दिले. याच दरम्यान काहींनी जुन्या गाण्यांवर ठेका धरत धम्माल उडवून दिली. तर काही आजी-आजोबांनी रॅम्प वॉकमध्ये भाग घेतला.