शेतकरी आंदोलनावरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्र शासनावर निशाणा साधला आहे. याद्वारे त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले असून खरमरीत सूचनाही केल्या आहेत. आपल्या ट्विटवरुन त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

जगताप यांनी म्हटलं की, “केंद्र सरकारने कृषी कायद्यांमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फायद्याबाबत नक्कीच अभ्यास केला असेल. शेतकर्‍यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती कशी सुधारेल? किती सुधारेल? याची माहिती त्यांच्याकडे असेलच. हा अभ्यास सरकारनं फक्त लोकांसमोर ठेवावा आणि जर अभ्यास केला नसेल तर सरळ तसं सांगावं. अन्यथा हे हिताचं आहे ते हिताचं आहे, ही वटवट पहिली बंद करावी.”

यापूर्वीही जगताप यांनी शेतकरी आंदोलनावरुन सरकारवर टीका केली होती. १५ जानेवारी रोजी शेतकरी अधिकार दिनानिमित्त ट्विटरवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी म्हटलं होतं की, “आज संपूर्ण देशभरात शेतकरी अधिकार दिवस साजरा केला जात आहे. मोदी सरकारने जे शेतकरीविरोधी काळे कायदे केले आहेत त्याविरोधात लाखो अन्नदाते दिल्लीच्या सीमांवर थंडीत, पावसात डटून आहेत. या आंदोलनादरम्यान ६० पेक्षा अधिक अन्नदात्यांनी आपलं प्राणार्पण दिलं आहे. मात्र, तरीही अहंकारी मोदी सरकारला त्याचं काहीही देणं घेणं नाही.”