सरकार स्थापन होईल तेव्हा होईल, पण अगोदर शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे. जर झाली नाही तर थेट आम्ही राज्यपालाच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहोत. त्यासंदर्भातच मी मातोश्रीवर आलो आहे. असे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार व प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज माध्यमांना सांगितले आहे. याप्रसंगी त्यांच्याबरोबर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे देखील होते.

राज्यातील सत्ता स्थापनेच्या पेचात मी मध्यस्थी करण्या एवढा मी मोठा नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी आता राज्यपालांनी पुढाकार घेतला पाहिजे.  सरकार बनेल तेव्हा बनेल अगोदर शेतकरी वाचला पाहिजे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी पुढाकरा घेऊन निर्णय घ्यायला हवा, अशी त्यांनी मागणी केली. राजकारणात फोडाफोडीशिवाय दुसरं काही होत नसतं असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंआहे.

विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार बचू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. अचलपूर मतदार संघातून बच्चू कडू यांनी काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख आणि शिवसेनेचे सुनीता फिस्के यांचा त्यांनी पराभव केला आहे. बच्चू कडु यांना ८१ हजार २५२ मतं मिळाली आहेत.