मनोरंजनासाठी ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ना पसंती

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना १ फेब्रुवारीपासून वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य दिले, परंतु त्याबाबत केबलचालक आणि डीटीएच चालकांचा उडालेला गोंधळ आणि मासिक शुल्कवाढ यामुळे ग्राहकांनी ‘ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म’ना (ओटीटी)’ पसंती दिली आहे. चालू वर्षांत ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ची ग्राहकसंख्या दुप्पट झाली आहे.

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीयो, अल्ट बालाजी, हॉटस्टार, झी ५, वूट, हंगामा प्ले, टीव्हीएफ प्ले, इरॉस नाऊ, सोनी लिव्ह यासारख्या लोकप्रिय ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ची ग्राहक संख्या वाढली आहे.

वाहिन्या निवडीचा हक्क मिळूनही केबलचालक आणि एमएसओ (मल्टी सिस्टीम ऑपरेटर्स) यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे ग्राहकांना मासिक शुल्क वाढीची झळ सोसावी लागत आहे. तसेच आवडीच्या वाहिन्या निवडताना पर्याय न मिळाल्यामुळे पुन्हा पॅकेजच घ्यावे लागत आहे. परिणामी, त्रासलेला ग्राहक ‘ओटीटी’ला पसंती देत आहे. म्हणूनच ‘ट्राय’च्या नियम अंमलबजावणीतील गोंधळ कमी होईपर्यंत वाहिन्यांना मोठय़ा प्रमाणावर ग्राहकवर्गाला मुकावे लागणार आहे.

‘ट्राय’च्या नव्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी खूप वेळ लागत आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या पाहता येत नाहीत. अशा ग्राहकांनी ‘झी ५’वर ऑनलाइन मालिका पाहायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉम्र्स ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे सुविधा देत असल्यामुळे ते तिकडे आकर्षित होत असल्याचे ‘झी५’चे व्यवसायप्रमुख मनीष अग्रवाल यांनी सांगितले.

‘हंगामा प्ले’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ रॉय म्हणाले, महिन्याला ६५ दशलक्ष (मिलियन) ग्राहक ‘हंगामा प्ले’वर कार्यक्रम पाहतात. त्याचबरोबर आमच्या नोंदणीकृत ग्राहकांमध्येही दुपटीने वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरात आणि २०१९ मधील जानेवारी ते मार्च दरम्यान ग्राहकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी आशय आणि मासिक शुल्कामध्ये विविध पर्याय उपलब्ध करून देत आहोत, असे अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सूत्रांनी सांगितले. तसेच गेल्या काही माहिन्यांत वाढलेल्या ग्राहकसंख्येत प्रामुख्याने वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग असल्याचे ‘वूट’च्या सूत्रांनी सांगितले. एकंदरीत ‘ट्राय’च्या नव्या नियमाचा फटका वाहिन्यांना बसला असून ग्राहकांनी त्यांच्या सोयीप्रमाणे आणि आवडीनुसार ओटीटी प्लॅटफॉर्मना पसंती दिली आहे.

पुढील वर्षी ५०० वेबसीरिज

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ने २० ते ८० च्या आसपास नव्या वेबसीरिजची घोषणा करतानाच ग्राहकसंख्येत वाढ झाल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या वर्षी आणि पुढील वर्षी मिळून ५००च्या आसपास नव्या वेबसीरिज येणार आहेत.

ओटीटी प्लॅटफॉम्र्स ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे सुविधा देत असल्यामुळे ते तिकडे आकर्षित होत आहेत.

– मनीष अग्रवाल, व्यवसायप्रमुख, ‘झी ५’