सत्ता स्थापनेबाबत येत्या दोन दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रिपणे निर्णय घेईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. उद्या याबाबत मुंबईत पुन्हा चर्चा होईल सध्या आमचं काहीही ठरलेलं नाही, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे.

सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे सर्व सूत्रं हलवणार आहेत. यासाठी शरद पवारांची सोनिया गांधींशी चर्चा झाली आहे. दोन दिवसांत आमचा निर्णय होईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने राज्यपालांना अद्याप कुठलेही पत्र दिलेले नाही. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची शरद पवारांची इच्छा होती त्यामुळे काँग्रेसचे दोन नेते पवारांशी चर्चा करतील, यावेळी राज्यातील नेतेही उपस्थित असतील. या चर्चेनंतरच पुढील पाऊल उचलण्यात येईल, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठींबा आहे, असे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसने काढलेल्या प्रसिद्धी म्हटले आहे की, काँग्रेस कार्यकारिणीची सकाळी बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर राज्यातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. काँग्रेसची राष्ट्रवादीशी पुढील चर्चा करेल.