22 November 2019

News Flash

एका युतीची ही पुढची गोष्ट- उद्धव ठाकरे

काय करायचं ते आमचं ठरलं आहे तुम्ही चिंता करू नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

आमच्या युतीची ही पुढची गोष्ट आहे, आधी काय घडलं? पुढे काय घडेल हे सगळे प्रश्न विचारले जात आहेत. जे उपस्थित होण्याची गरज नाही आमचं सगळं ठरलं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी आपली रोखठोक भूमिका मांडली. काय करायचं ते आम्ही करू, कारण युती करताना सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही युती केली आहे. आपण शिवसेनेच्या वर्धापन दिनी नाटक ठेवत असतो. कारण संघर्ष सुरूच असतो काही क्षण विरंगुळ्याचे असतात त्याच उद्देशाने हे नाटक ठेवले जाते. वर्धापन दिनी कोणतं नाटक ठेवायचं याची चर्चा झाली. नाटकं करणारे खूप आहेत. पण कोणतं नाटक ठेवायचं याचा विचार करत होतो. कुणीतरी सुचवलं की एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक ठेवा. तेव्हाच वाटलं की आता युतीची पुढची गोष्ट सांगावी. कारण भाजपा आणि शिवसेना यांचं हे नाटक नाही तर नैसर्गिक युती आहे. दोन्ही पक्षांची भावना अत्यंत महत्त्वाची आहे असंही उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं.

पक्षाच्या वर्धापन दिनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला बोलावणं ही ऐतिहासिक घटना आहे असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानले. यापुढे युतीमध्ये कोणतेही वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी आम्ही घेतली आहे असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. यावेळी वेडात मराठे वीर दौडले सात या गाण्याप्रमाणे वेडात दौडायचं नाही.. आणि फक्त सातच नाही तर आपल्याला एकसाथ पुढे जायचं आहे असंही वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तुटणार नाही फुटणार नाही घेतलेला वसा मोडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही त्यांनी कौतुक केलं. एखाद्याचा पराभव झाला तर आनंद व्यक्त करावा ही माझी शिकवण नाही. मात्र यावेळी ज्यांचा पराभव झाला त्यांच्याविषयी मला आनंदच झाला आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना डरपोक म्हणणाऱ्यांचा हा पराभव आहे. चर्चाही काय केली जाते? सावरकर नायक की खलनायक? ही चर्चा नालायकांनी करण्याची गरज काय? तुम्ही तुमची नालायकी सिद्ध केली ती बस झाली, असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

पवार कंपनी आहे तिथे राहू द्या!

विरोधी पक्षनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील होते ते आता भाजपात आले. मी खरंतर त्यांच्यावर टीका करणार होतो पण आता ते भाजपात आल्यावर काय बोलणार? मुख्यमंत्र्यांकडे काय शक्ती आहे ते माहित नाही. विरोधी पक्षनेतेप कुणाला  तरी दिलंय असं म्हणतात. असं उद्धव ठाकरेंनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर लगेचच पवार कंपनी आहे तिथेच राहुद्या असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

First Published on June 20, 2019 7:30 am

Web Title: our alliance is firm says uddhav thackeray scj 81
Just Now!
X