सबका साथ सबका विकास हे या सरकारचे ब्रीदवाक्य आहे. आमचा विकास हा आदर्श घोटाळ्यासारखा नाही असो टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणमध्ये झालेल्या भाषणात लगावला. आमचं सरकार हे वेगानं प्रगती करणारं सरकार आहे आधीच्या सरकारसारखं संथगतीचं नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. मागील सात ते आठ महिन्यांमध्ये घर विकत घेणारे ग्राहक वाढले आहेत. महाराष्ट्रात रेरा लागू केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन करतो असेही मोदींनी म्हटले आहे.

आश्वासन वेगळं आणि कृती वेगळी असे आधीच्या सरकारमध्ये व्हायचे सबका साथ सबका विकास हे आमचे लक्ष्य आहे आणि ते आम्ही पूर्ण करणारच असेही मोदींनी म्हटले आहे. मागील चार वर्षात मुंबईत मेट्रोचे जाळे पसरवण्यासाठी अनेक योजनांची सुरूवात आमच्याच सरकारने केली. मुंबईत 2006 मध्ये पहिल्यांदा मेट्रोच्या पहिल्या योजनेची सुरुवात झाली. पण आठ वर्षे हा प्रकल्प रखडला होता. हे प्रकरण कुठे अडकलं ते सांगता येणार नाही. आमच्या आधीचं सरकार आठ वर्षात फक्त 11 किमीचा मार्गच उभारू शकलं का? आणि ते कामही अपूर्णच कसं राहिलं? असेही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केले.