मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल शिवसेना शाखाप्रमुखाने माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याने शिवसेना पुन्हा ठोकशाहीकडे वळते की काय अशी चर्चा सुरू झाली असून त्याविरोधात क्षोभ उसळला आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या अनेक समाज घटकांनी, नामवंतांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढील अडचण वाढली आहे.

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसारित केले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे हात जोडून उभे आहेत, अशा आशयाचे हे चित्र होते. शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांनी त्याबाबत मदन शर्मा यांना दूरध्वनी करून जाब विचारला. त्यानंतर कदम आपल्या कार्यकर्त्यांसह शर्मा यांच्या कांदिवली येथील इमारतीखाली गेले आणि शर्मा यांना घराबाहेर बोलावून मारहाण केली. यात शर्मा यांच्या डोळ्याला जखम झाली. हा सर्व घटनाक्रम इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

वयोवृद्ध नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची दृष्ये शनिवारी वृत्तवाहिन्यांवरून झळकताच त्याचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांतील कॉम्रेड कृष्णा देसाई खून खटल्यातील आरोपापासून ते नंतरच्या काळात अनेक पत्रकार, साहित्यिक, कलावंत यांच्यावरील हल्ले-शाब्दिक चकमकी यांमुळे शिवसेना हा हिंसेचा अवलंब करणारा प्रतिक्रियावादी पक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक शिवसेनेला विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळात मवाळ स्वरूप दिल्याने पक्षाची प्रतिमा बदलली होती. आधी कंगना राणावत प्रकरण आणि आता माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणामुळे निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. शिवसेना पुन्हा ठोकशाहीकडे वळत असल्याची चर्चा सुरू झाली. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ट्विट करून या मारहाणीचा निषेध नोंदवला.

आरोपींना जामीन मदन शर्मा यांच्या तक्रीवरून पोलिसांनी शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांच्यासह सहा जणांवर गुन्हा नोंदविला होता. त्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. शनिवारी सर्व आरोपींना जामिनावर सोडण्यात आले.

महाराष्ट्र हे कायद्याचेच राज्य- संजय राऊत

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत शुक्रवारी एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक होते आणि हल्ला ही शिवसैनिकांची संतप्त उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.