मुंबई : बालमृत्यू कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोटय़वधी रुपयांच्या जननी-शिशू सुरक्षासारख्या विविध योजना यशस्वी होत असल्याचा राज्य सरकार कितीही दावा करत असले तरीही राज्यात गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण बालमृत्यूंपैकी ६५ टक्के बालकांचा मृत्यू हा जन्मल्यानंतर महिनाभराच्या आत झाल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या आकडेवारीमधून निदर्शनास आले आहे. या बालकांचा मृत्यू मुख्यत्वे कमी वजन आणि अपुऱ्या दिवसांचे बालक जन्माला आल्याने झाल्याचे समोर आले.

राज्यामध्ये एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळामध्ये एकूण १३,५४१ बालमृत्यू झाले आहेत. यामध्ये ६५ टक्के बालकांचा मृत्यू हा जन्मल्यानंतर महिनाभराच्या आतच झाला आहे. सर्वात जास्त बालमृत्यू हे बाळाचे वजन कमी असणे किंवा अपुरी वाढ झालेले बालक जन्माला येणे यामुळे झालेले आहेत. राज्य कुटुंब कल्याण विभागाकडून माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी ही माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त केली आहे.

या खालोखाल जन्माला आल्यापासून वर्षभराच्या काळामध्ये २१ टक्के बालकांचा मृत्यू झाला आहे, तर एक ते पाच वर्षांदरम्यानच्या काळामध्ये १४ टक्के बालकांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

जन्मत:च होणाऱ्या विविध आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १२ टक्के आहे, तर श्वसनाच्या आजारामुळे ९ टक्के आणि श्वसनमार्गाच्या विकारांमुळे १० टक्के बालकांचा मृत्यू झाला असल्याचे यामधून स्पष्ट होत आहे. न्यूमोनिया व जंतुसंसर्गामुळे ७ टक्के बालकांचा मृत्यू झाला आहे. बालमृत्यूच्या या आकडेवारीमध्ये मुलांचे प्रमाण ५४ टक्के असून मुलींचे प्रमाण ४६ टक्के आहे.