आपल्याला पाहिजे त्या मोबाइल नेटवर्क कंपनीची सेवा घेण्याची मुभा देशात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून उपलब्ध झाली. याचा फायदा मार्च २०१५ पर्यंत देशातील तब्बल १५ कोटी ३८ लाख ४५ हजार ३२२ मोबाइल ग्राहकांनी घेतला आहे. एकटय़ा मार्च महिन्यात ही संख्या ३८ लाख ३५ हजार ७७२ इतक्या लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
आपण सध्या वापरत असलेल्या मोबाइल नेटवर्क कंपनीची सेवा आपल्याला आवडत नसेल तर आपल्या मोबाइल नेटवर्क वर्तुळातील दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्याची मुभा देणारी नंबर पोर्टेबिलिटी ही सुविधा १ जानेवारी २०११पासून सुरू करण्यात आली. या चार वर्षांच्या कालावधीत १५ कोटींहून अधिक ग्राहकांनी या सेवाचा फायदा घेतला आहे. यामध्ये राजस्थान वर्तुळातील ग्राहक संख्या आघाडीवर असून या वर्तुळामध्ये आजपर्यंत एक कोटी ४६ लाख ५९ हजार ३१८ जणांनी या सुविधेचा फायदा घेतला आहे तर या खालोखाल अरुणाचल प्रदेशमध्ये १ कोटी ४६ लाख ४७ हजार ७७ लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. महाराष्ट्र वर्तुळामध्ये एक कोटी १७ लाख ७२ हजार १९१ ग्राहकांनी तर मुंबई वर्तुळामध्ये ८४ लाख ७६ हजार ९३२ ग्राहकांनी याचा फायदा घेतल्याचे दूरसंचार नियमन प्राधिकरणाने (ट्राय) प्रसिद्ध केलेल्या आकडीवारीवरून समोर आले आहे.
मार्च अखेपर्यंत देशात चौदा अब्ज ३० लाख ८० हजार ग्राहकांकडे मोबाइल असल्याचेही ट्रायने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, देशात ६० टक्के मोबाइल ग्राहक हे त्यांना मिळणाऱ्या नेटवर्क सुविधेबाबत नाराज असून त्यांना सातत्याने कॉल ड्रॉप, इंटरनेट जोडणी न मिळणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे बहुतांश ग्राहक नंबर पोर्टेबिलिटीचा वापर करत असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मोबाइल कंपन्यांच्या काही चाचण्या बाकी असल्यामुळे ३ मे पासून सुरू होणारी नॅशनल नंबर पोर्टेबिलिटी सेवा दोन महिने लांबणीवर गेली आहे. ही सेवा सुरू झाल्यावरही ग्राहक संख्येत वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.