पतंगांच्या मांज्यामुळे दीडशे पक्षी जखमी, एका वटवाघळाचा मृत्यू

मकरसंक्रांतीनिमित्त तमाम मुंबईकरांनी रविवारी पतंगबाजीचा मनमुराद आनंद लुटला. मात्र मुंबईकरांची पतंगबाजी पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरली. पतंगाच्या धारधार मांज्यामुळे अनेक पक्ष्यांवर पंख गमावण्याची वेळ ओढवली, तर काही पक्ष्यांचे पाय तुटले. यामुळे या पक्ष्यांना भविष्यात भरारी घेणे अवघड बनणार असल्याची खंत पक्षीप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली. पतंगाच्या मांजामुळे मुंबईत सुमारे १४० ते १५० पक्षी जखमी झाल्याची तक्रार सामाजिक संस्थांनी केली आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी सुमारे ५०० पक्षी जखमी झाले होते. त्या वेळी परळ येथील बैलघोडा रुग्णालयात १५० पक्ष्यांना दाखल करण्यात आले होते. तर या वर्षी बैलघोडा रुग्णालयात दाखल झालेल्या पक्ष्यांची संख्या ७३ पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. रविवारी रुग्णालयात दाखल झालेल्या पक्ष्यांमध्ये ६२ कबूतरे, ७ घारी, १ बगळा, ३ पोपट यांचा समावेश आहे. या पक्ष्यांवर बैलघोडा रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील ३ ते ४ कबुतरांचे पाय कापले गेले आहे. कायमचे अपंगत्व आल्यामुळे भविष्यात या पक्ष्यांना उडता येणे शक्य होणार नाही. तर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतर्फे सुमारे ५२ पक्ष्यांना बाहेरच उपचार देऊन सोडण्यात आले, असे बैलघोडा रुग्णालयाचे सचिव डॉ. सी. खन्ना यांनी सांगितले. तर १५ ते २० कबुतरांचे पंख कापले गेल्याचेही त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या पतंगबाजीमुळे डोंबिवली येथील एका वटवाघळाला प्राण गमवावा लागला. या वटवाघळ्याच्या गळ्याला मांजा अडकल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे ‘पॉज’ या संस्थेचे प्रमुख नीलेश भणगे यांनी सांगितले. याबरोबरच एक जखमी घुबड सापडले असून त्याचे पंख कापले गेल्याने त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. ‘पॉज’ या संस्थेला सापडलेल्या जखमी पक्ष्यांमध्ये दोन कबुतरांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने चायनीज मांजाविरोधात मोहीम सुरू केली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी माजांमुळे जखमी झालेल्या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे, असे ‘स्पॅरो शेल्टर’ या संस्थेचे प्रमोद माने यांनी सांगितले. यंदा जखमी पक्ष्यांच्या तक्रारीचे प्रमाण कमी झाल्याचे माने यांनी सांगितले. संक्रांतीनंतरही झाडांमध्ये राहिलेल्या मांजामध्ये अडकून पक्षी जखमी झाल्याच्या तक्रारी येत असतात. यंदा ते प्रमाण कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘राजकीय पक्षां’च्या पतंगबाजीला विरोध

कल्याण परिसरात एका राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या पतंग महोत्सवावर पक्षी-प्राणी सामाजिक संस्थांनी खंत व्यक्त केली. या राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या पतंग महोत्सवात रहिवाशांसाठी मोफत पतंग-मांजाचे वाटप केले होते. राजकीय पक्षांचे अशा प्रकारचे महोत्सव पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत, अशी भावना या संस्थांनी व्यक्त केली.