मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवसांवर

मुंबई  : राज्यात करोनाच्या ७,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार झाली आहे. अवघ्या सहा दिवसांमध्ये राज्यातील करोनाबाधितांची संख्या ५० हजाराने वाढली.

गेल्या २४ तासांत राज्यात १७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ही १०,२८९ झाली.

दरम्यान, रविवारी दिवसभरात एक हजार २६३ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली असून, एकूण रुग्णसंख्या ९२ हजार ७२० इतकी झाली आहे. गेल्या ४८ तासांमध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईच्या विविध करोना काळजी केंद्रांमध्ये रविवारी ९४९ संशयीत रुग्णांना दाखल करण्यात आले असून आतापर्यंत केंद्रांमध्ये दाखल केलेल्या अशा रुग्णांची संख्या ६४ हजार ६१६ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांतील एक हजार ४४१ रुग्ण रविवारी बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ६४ हजार ८७२ झाली आहे.

गेल्या ४८ तासांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ३२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात २९ पुरुष आणि १५ महिलांचा समावेष होता. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी पाच हजार २८५ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात २,१५० नवे बाधित

ठाणे जिल्ह्य़ात रविवारी २ हजार १५० करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ३०४ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ५४ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्युसंख्या १ हजार ६१६ वर पोहोचली आहे.

रविवारी कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक ६६१, ठाणे शहर ४१७, नवी मुंबई ३१३, उल्हासनगर २८६, ठाणे ग्रामीण १३४, मीरा-भाईंदर ११९, अंबरनाथ १००, भिवंडी ७९ आणि बदलापूरमध्ये ४१ रुग्ण आढळून आले. तर, ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात त्यामध्ये नवी मुंबईतील ११, ठाणे ९, कल्याण ८, अंबरनाथमधील ८, मीरा-भाईंदरमधील ७, ठाणे ग्रामीणमधील ५, उल्हासनगरमधील ४ आणि भिवंडीतील २ रुग्णांचा समावेश आहे.

भिवंडीत टाळेबंदीला मुदतवाढ

भिवंडी शहरातील दाट वस्त्यांमधील संक्रमण अद्याप आटोक्यात न आल्याने महापालिका प्रशासनाने भिवंडी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील टाळेबंदीचा कालावधी १९ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढवला आहे. या कालावधीत शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कडक टाळेबंदी लागू असणार आहे.

वसईत ३६० जणांना संसर्ग

* वसईत शहर आणि ग्रामीण भागात रविवारी ३६० नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये ३५२ रुग्ण हे शहरी भागातील तर ८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर २०२ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. तर ३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

* वसई-विरार महापालिका हद्दीत ३५२ नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७ हजार ९६५ एवढी झाली आहे. तर मृतांचा आकडा १५८ एवढा झाला आहे.

* ग्रामीण भागात ८ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या ३८२ इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण १८४ रुग्ण बरे झाले तर १८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नवी मुंबईत दिवसभरात ३१३ रुग्ण

नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही वाढत आहे. रविवारी ३१३ नवे रुग्ण आढळले असून, एकूण संख्या ९ हजार ४४५ झाली आहे, यापैकी ५ हजार ६५२ रुग्ण बरे झाले आहेत. शहरात रविवारी ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ३०३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पनवेल तालुक्यातील बाधितांची संख्या ५ हजार २७ वर पोहचली. रविवारी १९४ रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत तालुक्यात १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ८५० जण करोनाबाधितांवर उपचार सुरू आहे.

पनवेल पालिकेने आरोग्य विभागात १६८ पदांची भरती जाहीर केली आहे. पनवेल पालिकेमध्ये राहणारे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. वैद्यकीय अधिकारी (आयुष) व आरोग्यसेविकांची प्रत्येकी ५० पदे भरली जाणार आहेत.