मुंबई : करोनामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवेत असलेले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सदस्य अशा तब्बल २०० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक कर्मचारी करोनाबाधित आहेत.

मृत झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील ७१ आणि मध्य रेल्वेवरील १३१ जणांचा समावेश असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार केले जातात. सध्याच्या घडीला २२ जण उपचार घेत आहेत. रेल्वेतील करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९१ टक्के  आहे. करोनाबाधितांमध्ये मोटरमन, लोको पायलट, रेल्वे सुरक्षा दल व अन्य तांत्रिक कर्मचारी आहेत. सप्टेंबपर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ६ ऑक्टोबपर्यंत रेल्वेतील मृतांची संख्या १९२ होती. त्यावेळी पश्चिम रेल्वेच्या ६३ आणि मध्य रेल्वेवरील मृतांची संख्या १२९ होती.

बेस्ट, एसटीच्या १३४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

करोनामुळे आतापर्यंत बेस्ट व एसटीच्या १३४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बेस्टचे ५० कर्मचारी दगावले आहेत.  ५० कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत असून ३० जण विलगीकरणात आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के  झाले आहे. एसटीतील कर्मचारीही करोनाग्रस्त असून एकू ण २ हजार ८७० जणांना त्याची लागण झाली आहे.  ८४ जण यामुळे दगावल्याची माहिती देण्यात आली.  ६९६ जणांवर उपचार सुरू आहेत. एसटीच्या ठाणे, जळगाव, पुणे, सांगली, नाशिक विभागाबरोबरच मुंबईतील एसटीच्या मुख्यालयातील करोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.