* जगातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळविल्याचा दावा *१,२०० हून अधिक भारतीय व्हिडीओ निर्मात्यांचे प्रत्येकी १० लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक
मुंबई : इंटरनेटवरील व्हिडीओ स्ट्रिमिंगचे जुने व लोकप्रिय संकेतस्थळ असलेल्या यूटय़ूबच्या प्रेक्षकसंख्येत भारत जगात अव्वल ठरला असून देशातील यूटय़ूब प्रेक्षकांची संख्या २६.५० कोटींवर पोहोचली आहे. केवळ व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याच नव्हे तर, यूटय़ूबसाठी चित्रनिर्मिती करणाऱ्यांची संख्याही वाढत असून त्यापैकी १,२०० हून अधिक वाहिन्या निर्मात्यांच्या सभासदांची संख्या प्रत्येक १० लाखांपेक्षा अधिक असल्याचा दावा ‘यूटय़ूब’ने केला आहे.
‘यूटय़ूब’च्या माध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या जाहिरातींचा प्रसार आणि प्रभाव यांची माहिती देण्यासाठी मुंबईत बुधवारी ‘ब्रॅण्डकास्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘यूटय़ूब’च्या भारतातील वाढत्या प्रेक्षकसंख्येची माहिती देण्यात आली. ‘भारत हा आजघडीला आमची सर्वाधिक आणि सर्वात वेगाने वाढणारी प्रेक्षकसंख्या असलेला देश आहे. मनोरंजन असो की माहिती, दोन्हींसाठी यूटय़ूबला भारतीयांची पहिली पसंती मिळत आहे’, अशी माहिती यूटय़ूबच्या विशेष कार्यकारी अधिकारी सुझेन वोजिस्की यांनी दिली. गेल्या वर्षभरात मोबाइलवरून यूटय़ूब पाहणाऱ्यांचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहोचले असून त्यापैकी जवळपास ६० टक्के प्रेक्षक हे देशातील सहा प्रमुख महानगरांबाहेरील आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
यूटय़ूबच्या वाढत्या प्रेक्षकसंख्येचा जाहिरातदार वापर करू शकतात, असे मत ‘ग्रुपएम’ या माध्यम गुंतवणूकदार कंपनीच्या आशिया पॅसिफिक विभागाचे कार्याधिकारी मार्क पॅटरसन यांनी ‘ब्रॅण्डकास्ट’ कार्यक्रमात व्यक्त केले. मोबाइलवरून व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण वाढले असून या माध्यमातून आपल्या उत्पादनांचा प्रसार करण्याची संधी कंपन्यांना उपलब्ध झाली आहे, असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 2:59 am