जूनच्या पहिल्या पंधरवडय़ापर्यंत पुरेसे पाणी

मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमध्ये आजघडीला २९.९३ टक्के साठा शिल्लक असून करोनाच्या भीतीपोटी अनेकांनी मुंबईतून काढता पाय घेतला आहे. केवळ परप्रांतीयच नव्हे तर अनेकांनी कोकणातील गाव गाठले आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवडय़ापर्यंत हा पाणीसाठा पुरेसा असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावांतून दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही तलावांमध्ये सुमारे चार लाख ३३ हजार १७७ दशलक्ष लिटर इतका जलसाठा आजघडीला उपलब्ध आहे. साधारण तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल इतका साठा आज तलावांत शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत तलावांमध्ये सुमारे चार लाख ७५ हजार ३५४ दशलक्ष लिटर, तर २०१९ मध्ये तीन लाख २८ हजार ०४९ दशलक्ष लिटर पाणी होते. गत वर्षांच्या तुलनेत काही तलावांमध्ये कमी साठा शिल्लक असला तरीही पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल.

पाणीकपात होण्याची शक्यता कमी

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणामध्ये गेल्या वर्षी दोन लाख १४ हजार ३६९ दशलक्ष लिटर पाणी होते. आजघडीला सुमारे एक लाख ८६ हजार ८२४ दशलक्ष लिटर इतके पाणी आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा २७ हजार ५४५ दशलक्ष लिटर पाणी कमी आहे, तर भातसा, विहार आणि तुळशी तलावात आजघडीला सुमारे दोन लाख ४६ हजार ३५३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी तो दोन लाख ६० हजार ९८५ दशलक्ष लिटर होता. मागील वर्षांच्या तुलनेत त्यात १४ हजार ६३२ दशलक्ष लिटरची तूट आहे. असे असले तरी पाणीकपातीची वेळ मुंबईत ओढवणार नाही, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.