मागील दहा वर्षात मुंबईत आग लागण्याच्या ४९ हजार घटना घडल्या आहेत आणि या घटनांमध्ये ६०९ लोकांनी त्यांचा प्राण गमावला आहे अशी माहिती राज्याचे नागरी विकास मंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली. २००८ ते २०१८ या दहा वर्षांमधला अहवाल यावेळी मांडला गेला. या अहवालात मुंबईत आग लागण्याच्या ४९ हजार ३९१ घटना घडल्या तर या घटनांमध्ये ६०९ जणांचा बळी गेला असे नमूद करण्यात आले आहे.

आग लागण्याच्या ३३ हजार ९४६ घटनांमध्ये शॉर्ट सर्किट किंवा वीज तारेतील बिघाड हे प्रमुख कारण होते. तर गॅस गळती किंवा स्फोट यामुळे १, ११६ वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या. तर १४ हजार ३२९ घटनांमध्ये विविध कारणांमुळे आग लागली. या घटनांमध्ये जे ६०९ लोक मरण पावले त्यात सात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता अशीही माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. तर या घटनांमुळे दहा वर्षात ११०.४२ कोटींचे नुकसान झाले आहे.

बांद्रा या ठिकाणी लागलेली आग ही सर्वात मोठी घटना होती असे पाटील यांनी अहवालात नमूद केले आहे. तसेच झोपडपट्टीला आग लागण्याच्या सुमारे ३ हजार १५१ घटना मागील दहा वर्षात घडल्या आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. झोपडपट्ट्यांना आग लागण्याच्या घटना घडू नयेत म्हणून १७ अग्निशमन केंद्रंही उभारण्यात आली आहेत. तसेच १७ त्वरित प्रतिसाद देणाऱ्या बंबांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाच्या ५ हजार कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेसंदर्भातले प्रशिक्षण देण्यात आले आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या अहवालाबद्दल बोलत असताना पाटील यांनी कमला मिल भागात लागलेल्या आगीच्या घटनेचाही उल्लेख केला. तसेच साकीनाका भागात फरसाण दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेचाही उल्लेख केला.