रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के

मुंबई : मुंबईमधील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के झाल्याची दिलासादायक बाब असली तरी शुक्रवारी मुंबईमधील एक हजार २६९ जणांना करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे रुग्णांची संख्या ६४ हजार ६८ वर पोहोचली आहे. करोनामुळे ११४ जणांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.मुंबईमध्ये शुक्रवारी ४०१ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे आतापर्यंत ३२ हजार २५७ रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्के झाले आहे. शुक्रवारी विविध रुग्णालयांमध्ये ७९१ करोना संशयितांना दाखल करण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या करोना संशयितांची संख्या ४५ हजार ३३९ इतकी आहे. मुंबइतील ११४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. यापैकी ५५ जणांचा मृत्यू १६ ते १८ जून दरम्यान, तर ५९ जणांचा मृत्यू १५ जूनपूर्वी झाला.

ठाणे जिल्ह्य़ात  ८५७ नवे रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरामध्ये करोनाचे ८५७ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता १९ हजार ५२० इतका झाला आहे. तर, शुक्रवारी जिल्ह्यात ३२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ६५७ झाली आहे.  शुक्रवारच्या  रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १८७, नवी मुंबई शहरातील १२४, कल्याण-डोंबिवलीतील २३६, भिवंडी शहरातील ६७, अंबरनाथ शहरातील ७४, उल्हासनगर शहरातील ४६, बदलापूरमधील २७, मीरा-भाईंदर शहरातील ६६ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ३० रुग्णांचा समावेश आहेत. शुक्रवारच्या मृत्यूंमध्ये ठाण्यातील १०, नवी मुंबईतील ९, भिवंडीतील ६, मीरा-भाईंदरमधील ४ तर कल्याण, उल्हसनगर आणि अंबरनाथमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

देशात दिवसात सर्वाधिक १३ हजार ५८६ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासांमध्ये १३ हजार ५८६ करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. त्याआधी दिवसभरात १२ हजार ८८१ नवे रुग्ण आढळले. एकूण करोना रुग्णांची संख्या ३ लाख ८० हजार ५३२ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ३३६ मृत्यू झाले असून एकूण मृत्यू १२ हजार ५७३ झाले आहेत.  दरम्यान, करोनाची लागण झाल्याने दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे.