22 July 2019

News Flash

होळीतील मनमानीने तरुणी, महिला बेजार

मनाविरुद्ध रंग लावणे, फुगे मारणे हे एखाद्याला मानहानीकारक वाटू शकते, हे आपल्याला कधी कळणार असा प्रश्न एका तरुणीने केला.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

आठवडाभर आधीच रंग, पाण्याचा मारा करण्यास सुरुवात

रोष विसरून एकमेकांना रंगांत न्हाऊ घालणारा सण, अशी होळीची ओळख! मात्र, तरी अनेक ठिकाणी जबरदस्तीने रंग लावणे, पैसे उकळणे, घरात-पाणी टाकणे अशा किळसवाण्या पद्धतींचा शिरकाव झालेला दिसतो. त्यामुळे अनेक तरुणी आणि महिलांना होळी आणि होळीपूर्वीचा आठवडा अगदी नकोसा होऊन जातो.

होळी, धुळवडीच्या दिवशी रस्त्यावर येता-जाता फुग्यांचा, पाण्याचा मारा तर होतोच. परंतु, अनेक चाळी, वस्त्या, सोसायटय़ांमध्ये होळीच्या आठवडाभर आधीच रंग, फुगे, पाणी टाकण्याचे प्रकार सुरू होतात. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांत किंवा कार्यालयात जाणे कठीण होऊन बसते. होळीच्या दिवशी अनेक तरुण मुली घरात राहणेही टाळतात. शक्य झाल्यास एक दिवस घर बंद करून बाहेरगावी जातात. चित्रपटगृहात किंवा मॉलमध्ये जाऊन वेळ घालवतात. मोठय़ा सोसायटय़ांमध्येही हे चित्र दिसते. दक्षिण, मध्य मुंबईतीलच नव्हे तर उपनगरांतील चाळक ऱ्यांसाठीही हे नवीन नाही.

कोकणात शिमगा मोठा धूमधडाक्यात साजरा होतो. घरोघर खेळे किंवा नाचे पारंपरिक नृत्य करून बक्षीस मिळवतात. पण मुंबईच्या काही वस्त्यांमध्ये चित्रपट गीतांवर ओंगळ नृत्य करून नंतर स्वतच ठरवलेली रक्कम प्रत्येक घरात जाऊन मागण्याची नवीनच ‘प्रथा’ निर्माण झाली आहे.

‘ही रक्कम १०० पासून ५०० रुपयांपर्यंत कितीही असते. एवढी रक्कम आम्ही का द्यायची, असे कुणी विचारले तर त्यावर घरातल्या कमावत्या व्यक्तींचे दाखले देऊन तुम्हाला काय कमी आहे, म्हणून ऐकवले जाते.

पैसे देणार नसाल, तर रंग खेळायला घराबाहेर या, असे फर्मावले जाते. तरीही बधले नाही की दरवाजावर रंग ओतणे, दार उघडे दिसले तर घरातील ज्या तरुण मुलांना रंग लावून घ्यायचा नसतो त्यांनाही ओढून घराबाहेर आणणे आणि रंग फासणे, असे प्रकार घडतात. त्यामुळे होळीचा अलीकडे बेरंगच होऊ लागला आहे,’ असा अनुभव दादरच्या आगर बाजारमधील एका चाळीतील तरुणीने सांगितला. हुल्लडबाजी करणारे शेजारीच आहेत. त्यांचा रोष नको म्हणून स्वत:चे नाव उघड करण्यासही ती बिचकत होती.

मनाविरुद्ध रंग लावणे, फुगे मारणे हे एखाद्याला मानहानीकारक वाटू शकते, हे आपल्याला कधी कळणार असा प्रश्न एका तरुणीने केला. सहा वर्षांपूर्वी मुंबईत राहायला आल्यापासून होळीच्या दिवशी  बाहेर जाऊन चित्रपट पाहणे, हाच तिचा शिरस्ता झाला आहे. होळीतील मनमानीने अनेक मुंबईकर बेजार झाले आहेत.

धुळवडीच्या उत्साहावर विरजण पाडणारे अनुभव तुम्हालाही आले असतीलच. हे प्रसंग आम्हाला कळवा. या अनुभवांना पुढील आठवडय़ात प्रसिद्धी दिली जाईल. vachak.loksatta@expressindia.com या ईमेलवर तुमचे अनुभव कळवा.

मी चेंबूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात शेवटच्या वर्षांत आहे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आजुबाजूला लोकवस्ती आहे. तिथून फुगे मारले जातात. हे एकाच दिवसापुरते मर्यादित नसते. त्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागतो.

-मानसी पटेल, विद्यार्थिनी,

धूलिवंदनच्या दिवशी हमखास फुग्यांचा मारा खातच मॉलमध्ये कामाला जावे लागतो. रंगीत पाण्यामुळे कपडे खराब होतात. परंतु, तसेच कामावर जावे लागते. लोकल ट्रेनवर फुगे मारणारे महाभागही असतातच.

-उज्ज्वला शिंदे, मॉलधील कर्मचारी, चेंबूर.

First Published on March 16, 2019 12:47 am

Web Title: over the week color began to hit the water