रबाळे रेल्वे स्थानकात फलाटांची लांबी वाढविण्यासाठी सुरु असलेल्या कामासाठी टाकण्यात आलेले सिमेंटचे पत्रे दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरवर आदळल्याने नेरुळ-ठाणे आणि वाशी-ठाणे या मार्गावरील रेल्वे सेवा तब्बल तीन तासांसाठी ठप्प झाली. या पत्र्यांचे काही भाग ठाणे- वाशी मार्गावरही कोसळले. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.
ठाणे-वाशी मार्गावर वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमधील फलाटाची उंची वाढविण्याची कामे सुरु असून कोपरखैरणे, घणसोली तसेच रबाळे स्थानकात ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. रबाळे रेल्वे स्थानकात फलाटांची उंची वाढविताना त्यावर शेड उभारण्याची कामेही सुरू करण्यात आली आहेत. गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास यापैकी काही शेडवरील पत्रे अचानक घसरले आणि दोन्ही दिशेच्या मार्गावर आदळले. यापैकी काही पत्रे थेट ओव्हरहेड वायरवर आदळून झालेल्या विचीत्र अपघातामुळे वाशी-ठाणे बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. या शेडखाली कोणीही प्रवासी नसल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, ओव्हरहेड वायरचा काही भाग तुटल्याने वाशीकडून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात आली. नेरुळ तसेच पनवेलकडून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूकही ठप्प झाली. पत्र्यांचा काही भाग ठाणे-वाशी रेल्वे मार्गावर पडल्याने या मार्गावरील काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे पत्रे तातडीने हटविले. त्यामुळे अध्र्या तासात ही वाहतूक पुर्ववत झाली. रबाळे स्थानकातील ओव्हरहेड वायरचे काम सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुर्ण करण्यात आले. त्यानंतर साडेपाच वाजता या मार्गावरील वाहतूक पुर्ववत झाली. ठाणे-वाशी मार्गावर दुपारच्या सुमारास फारशी गर्दी नसते. गर्दीच्या वेळेत वाहतूक पुर्ववत करण्यात प्रशासनाला यश मिळाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.