20 February 2019

News Flash

वेगवाहनांवरील कारवाईला गती

एखादे वेगाने येणारे वाहन या कॅमेऱ्यात कैद केले जाते. त्यात त्याचा गाडी क्रमांकही येतो.

(संग्रहित छायाचित्र)

‘स्पीड कॅमेऱ्यां’मुळे आठ महिन्यांत ६ लाख ४९ हजार चालकांवर कारवाई

मुंबई : भरधाव वाहनांच्या वेगाची नोंद ठेवण्यासाठी मुंबईत ७५ ठिकाणी लावण्यात आलेल्या ‘स्पीड कॅमेऱ्यां’मुळे वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या चालकांची नोंद ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठ महिन्यांत अशा ६ लाख ४९ हजार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु ई-चलनच्या माध्यमातून या वाहनचालकांना दंड ठोठावण्यात येत असल्याने वसुलीत मात्र वाहतूक पोलीस मागेच आहेत.

भरधाव किंवा बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघातांना निमंत्रण दिले जाते. अशा चालकांना आळा घालणे हे पोलिसांच्या दृष्टीनेही आव्हानात्मकच असते. पूर्वी भरधाव वाहन चालविणाऱ्या चालकांना रस्त्यावरच थांबवून त्यांच्याकडून पोलीस दंड वसूल करत. एखादा चालक अशाप्रकारे नियम मोडताना दिसल्यास आणि त्याला तिथेच थांबविणे शक्य नसल्यास पुढील वाहतूक चौकीवर असणाऱ्या पोलिसाला वॉकीटॉकीद्वारे कळवून कारवाई केली जात असे. तरीही चालकांकडून वाहतूक नियमांना तिलांजली दिली जाई. ही कारवाई अधिक कठोरतेने व्हावी आणि त्यात वाढ व्हावी यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वर्षभरापूर्वी ठिकठिकाणी स्पीड कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. सध्या मुंबईत ७५ स्पीड कॅमेरे बसविण्यात आले असून यात आणखी वाढ केली जाणार

आहे. या स्पीड कॅमेऱ्यात जानेवारी ते ऑगस्ट २०१८ पर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल ६ लाख ४९ हजार ९९९ चालक अडकले आहेत. त्यांच्याकडून ६ कोटी २१ लाख ५४ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कारवाईत तब्बल चौपटीने वाढ झाली आहे. मुंबईत बसविण्यात आलेल्या स्पीड कॅमेऱ्यांमुळेच कारवाईत वाढ झाल्याचे वाहतूक पोलीस सांगतात.राज्यभरात आठ महिन्यांत वेगाने वाहन चालविणाऱ्या ६ लाख ५३ हजार २४६ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात एकटय़ा मुंबईचाच आकडा ६.४९ लाख आहे. तुलनेत नवी मुंबई शहरात केवळ १,३३० , अहमदनगरमध्ये ३१८ आणि ठाण्यात २३६ चालकांवर कारवाई झाली आहे.

कॅमेऱ्यांचे स्वरूप

एखादे वेगाने येणारे वाहन या कॅमेऱ्यात कैद केले जाते. त्यात त्याचा गाडी क्रमांकही येतो. त्यानंतर त्याला दंडाचा संदेशही जातो. अशाप्रकारे केल्या जाणाऱ्या कारवाईत वाढ होत आहे. मुंबईतील काही भागांत वाहनांसाठी प्रतितास ६० ते १०० पर्यंत वेग मर्यादा आहे. मुंबईत सी-लिंक, पश्चिम द्रूतगती मार्ग, जे. जे. पूल, मरिन लाइन्स, वांद्रे पश्चिम या ठिकाणी मोठी कारवाई झाली आहे.

मुंबईत बसविण्यात आलेल्या स्पीड कॅमेऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणात कारवाई होत आहे. या कॅमेऱ्यांच्या संख्येत लवकरच आणखी वाढ केली जाणार आहे.

– अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलीस

First Published on October 12, 2018 2:44 am

Web Title: overspeeding fine speed cameras to put brakes on rash driving