ऑक्सफर्डच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसरी मात्रा देण्यास सुरुवात

मुंबई : महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात २०० स्वयंसेवकांवर ऑक्सफर्डच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असून लशीचा पहिली मात्रा  देण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसरी मात्रा देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ज्या स्वयंसेवकांना पहिली मात्रा देऊन २९ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांची प्रकृती उत्तम आहे.

देशात सध्या तीन लशींवर संशोधन केले जात असून त्यापैकी सीरम इन्स्टिटय़ूट ही संस्था ऑक्सफर्ड लशीवर संशोधन करीत आहे. या चाचणीचा पहिला टप्पा मुंबईत करण्यात आला नव्हता. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी मुंबईत केली जात आहे. त्यासाठी मुंबईत पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात चाचण्या सुरू आहेत. केईएममध्ये १०० आणि नायरमध्ये १०० स्वयंसेवक अशा २०० स्वयंसेवकांवर ही चाचणी सुरू आहे. या स्वयंसेवकांना २९ दिवसांच्या अंतराने लशीच्या दोन मात्रा दिल्या जाणार आहेत. त्यातील पहिली मात्रा देण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर २६ ऑक्टोबरपासून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येत्या १० ते १५ दिवसांत दुसरी मात्रा देण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या सर्व स्वयंसेवकांचा दर दिवशी पाठपुरावा करत आहोत. मात्र एकालाही प्रकृतीची कोणतीही तक्रार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

 

दुसरी मात्रा देऊन २९ दिवस पूर्ण झाल्यानंतर या सर्व स्वयंसेवकांची तपासण्या करून त्याचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) पाठवला जाईल. सर्व काही नियोजन केल्याप्रमाणे झाल्यास जानेवारीपर्यंत लस येण्याची शक्यताही काकाणी यांनी वर्तवली.