ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या करण्यासाठी केईएमच्या एथिक्स समितीने परवानगी दिली असून मुंबईत लवकरच चाचण्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सिरम इन्स्टिटय़ूटकडून पुणे आणि मुंबईत ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईत केईएम आणि नायर रुग्णालयात या चाचण्या होणार आहेत. मुंबईत प्रत्यक्ष चाचण्या सुरू झाल्या नसल्या तरी पूर्वप्रक्रिया सुरू आहे. केईएमच्या एथिक्स समितीने लशीच्या वैद्यकीय चाचण्यांना मंगळवारी परवानगी दिली आहे. लस टोचून घेण्यासाठी शहरातील जवळपास चारशे स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. लस टोचण्यासाठी निर्देशित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या स्वयंसेवकांची निवड पहिल्या टप्प्यात केली जाईल. त्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी आरटीपीसीआर, प्रतिपिंड (अँटिबॉडी) या चाचण्या केल्या जातील. यातून १०० स्वयंसेवकांची निवड केली जाईल. लवकरच या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

नायर रुग्णालयाने स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण केली असली तरी सिरम इन्स्टिटय़ूट आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडून स्वयंसेवकाचा विमा आणि इतर बाबींबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु प्रत्युत्तर न आल्याने प्रक्रिया थांबली असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.