महाराष्ट्रातील प्राणवायूचा (ऑक्सिजन) तुटवडा भरुन काढण्यासाठी अन्य राज्यांकडून प्राणवायुचा पुरवठा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतून १९ एप्रिलला सात टँकर रेल्वेमार्फत विशाखापट्टणम येथे पाठवण्यात आले होते. टँकरमध्ये प्राणवायू भरल्यानंतर ही एक्स्प्रेस गुरुवारी (२२ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास महाराष्ट्रासाठी रवाना झाली. शुक्रवारी रात्रीपर्यंत प्राणवायू एक्स्प्रेस महाराष्ट्रात प्रवेश करेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. प्राणवायू एक्स्प्रेस महाराष्ट्रासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून दिली. त्यामुळे राज्याची प्राणवायूची गरज काहीशी भागणार आहे.

गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या वाढत असून प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे राज्यात प्राणवायूचा तुटवडाही भासू लागला आहे. ही गरज भागवण्यासाठी महाराष्ट्राकडून अन्य राज्यांची मदत घेतली जात आहे. त्यासाठी रेल्वेच्या मदतीने सात टँकर रो रो सेवे मार्फत कळंबोलीतून विशाखापट्टणम येथे पाठवण्यात आले. विजाग, जमशेदपूर, राऊरके ला, बोकारो असा प्रवास या एक्स्प्रेसने के ला. विशाखापट्टणमधील प्लांटमधून द्रवरूप प्राणवायू टँकरमध्ये भरण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर गुरुवारी रात्री एक्स्प्रेस महाराष्ट्रासाठी रवाना झाली. प्राणवायूची वाहतूक रस्त्यापेक्षा रेल्वेने अधिक अधिक जलद होते. त्यामुळेच रेल्वेच्या रो रो सेवेमार्फत प्राणवायू टँकरमार्फत राज्यात आणण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातही या एक्स्प्रेसचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी ग्रीन कॉरीडोरही केला जाणार आहे.