|| संतोष प्रधान

शरद पवार यांचे एके काळचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात भाजपने विरोधात असताना कायमच आक्रमक भूमिका घेतली होती. न्या. सावंत आयोगाच्या अहवालानंतर राजीनाम्यासाठी तर पवनराजे हत्याप्रकरणी अटकेसाठी भाजपने डॉ. पाटील यांच्याविरोधात आकाशपाताळ एक केले होते. त्याच पाटील यांच्या मुलाला उद्या भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे.

डॉ. पद्मसिंह पाटील हे आक्रमक राजकारणी म्हणून प्रसिद्ध होते. गैरव्यवहार आणि खुनाच्या आरोपांमध्ये पाटील अडकल्यावर त्यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. न्या. सावंत आयोगाच्या अहवालानंतर डॉ. पाटील यांच्यासह तीन मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आणि शिवसेनेने विधिमंडळाचे कामकाज आठवडाभर बंद पाडले होते.

कारगिल युद्धानंतर साखर कारखान्यांनी मदतनिधी उभा केला होता. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याशी संबंधित तेरणा सहकारी साखर कारखान्याने सभासदांकडून कारगिल मदतनिधीसाठी उसाच्या चुकाऱ्यातून पैसे कापून घेतले होते, पण प्रत्यक्ष मदतनिधीत तेरणा कारखान्याने पैसे जमा केले नव्हते. याबरोबरच तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्रीतही घोटाळा झाला होता. सुमारे ३० कोटी यात बुडाले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर चौकशीकरिता तत्कालीन आघाडी सरकारने न्या. सावंत आयोगाची नियुक्ती केली होती. न्या. सावंत आयोगाने डॉ. पाटील यांच्यासह सुरेश जैन, नवाब मलिक आणि विजयकुमार गावित या तत्कालीन मंत्र्यांवर गैरव्यवहारप्रकरणी ताशेरे ओढले होते. यापैकी गावित वगळता अन्य तिघांनी राजीनामे दिले होते.

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी डॉ. पाटील यांच्याविरोधात कारवाईसाठी भाजपने मागणी केली होती. विधानसभेत डॉ. पाटील आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात शेरेबाजी आणि हातवारे हे तर तेव्हा भलतेच गाजले होते. पुढील काळात मुंडे आणि पाटील यांच्या अबोला होता. मुंडे यांनी टोकाची विरोधात भूमिका घेतलेल्या पप्पू कलानीच्या सुनेला भाजपने महापौर केले. डॉ. पाटील यांच्या मुलाला आता भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे.

चुकीचे असेल तेव्हा विरोध करायचा ही भाजपची सुरुवातीपासून भूमिका होती व आजही आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या मुलाने पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला प्रवेश देण्यात येणार आहे.   -चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष