बारीक कोंडय़ामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून गोडय़ा पाण्यातील माशांची मागणी वाढल्यामुळे मुंबईत हैदराबाद, कर्नाटक येथून मोठय़ा प्रमाणावर मुंबईत गोडय़ा पाण्यातील मासे येऊ लागले आहेत. मात्र या माशांमुळे दादरकरांना वेगळ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे मासे मोठय़ा प्रमाणावर दादरच्या पालिका मंडईत उतरवले जातात. मासे साठवण्यासाठी बर्फ आणि तांदळाच्या कोंडय़ाचा भुसा वापरला जातो. मासे मंडईत उतरवल्यानंतर हा भुसा रस्त्यावरच टाकला जात असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा त्रास सोसावा लागतो आहे.

दादर पश्चिमेला फुलबाजारातून बाहेर आल्यावर तुळशी पाइप मार्गावरून लोअर परेलच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला पालिकेची मंडई आहे. या मंडईत माशांची घाऊक प्रमाणावर आयात होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या मंडईच्या बाहेर सकाळच्या वेळी माशांचे ट्रक मोठय़ा प्रमाणावर उभे असतात. याच मंडईच्या बाहेर लोअर परेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे २५ ते ३० मीटपर्यंतच्या भागात तांदळाच्या भुशाची रास पडलेली असते. या भुशाचा त्रास पादचाऱ्यांना व वाहनचालकांना होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. वाहनांच्या ये-जा करण्यामुळे हा भुसा उडून नाका, तोंडात, डोळ्यात जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दुचाकीवरून जाणाऱ्यांना तर या भुशाचा खूप त्रास होतो, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अन्सारी यांनी केली आहे. पालिकेचे सफाई कामगार हा भुसा ब्रशने फक्त आत सरकवण्याचे काम करतात हा भुसा कोणीही उचलत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.  या भुशामुळे पर्जन्य जल वाहिन्यादेखील तुंबण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. वर्षांनुवर्षे रस्त्यावर हा भुसा असाच पडून राहू नये तो एकतर उचलावा किंवा संबंधितांवर कारवाई तरी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून हे मासळी मार्केट इथेच असून मासे टिकवण्यासाठी भुशाचा वापर केला जातो. इतर राज्यांतून मासे आणताना मासे टिकावे म्हणून बर्फ आणि भुशाचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून या मासळी मार्केटमध्ये हा भुसा आणला जातो. तसेच या प्रकरणी दुपारी एक वाजेपर्यंत हा भुसा रोज साफ करावा असे आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिलेले आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.