आंतराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले हृदयरोगतज्ज्ञ आणि पद्म पुरस्काराने सन्मानित डॉ. बी. के. गोयल यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. वैद्यकीय क्षेत्रात अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिलेल्या गोयल यांच्या मृत्यूने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. गोयल यांच्या पार्थिवावर बाणगंगा स्मशानभूमीमध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दक्षिण मुंबईतील ‘प्रभात’ या निवासस्थानी मंगळवारी न्याहरी केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास डॉ. गोयल हृदयविकाराच्या झटक्याने खाली कोसळले. त्यानंतर त्यांच्या मुलाने उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना तातडीने बीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करत असतानाच दुपारी साडेबारा वाजता त्यांचे निधन झाले.

पन्नास वर्षांहून अधिक वर्षांच्या वैद्यकीय सेवाकाळात डॉ. गोयल यांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता निस्पृह भावनेने रुग्णसेवा केली. राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयात हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. शेवटपर्यंत ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि मानद अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहिले. ह्य़ुस्टनस्थित टेक्सास हार्ट इन्स्टिटय़ूटमध्येही त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ सल्लागाराचे पद भूषविले. भारतीय सैन्यदलाच्या विभागाचेही ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या वैद्यकीय सल्लागार चमूमध्येही त्यांचा सहभाग होता. मुंबईतील हाफकिन संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांनी १४ वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या पुढाकारातूनच पोलिओची लस निर्मिली गेली असून त्याला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यतादेखील मिळाली आहे.

डॉ. गोयल हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयविकारतज्ज्ञ तर होतेच याशिवाय ते उत्तम वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञदेखील होते. वैद्यकीय क्षेत्रात, विशेषत: हृदयविकार क्षेत्रात अत्याधुनिक वैद्यकीय संशोधन आणि तंत्रज्ञान आणून त्यांनी आरोग्यसेवेत मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

– चे. विद्यासागर राव, राज्यपाल