मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी पद्याकर नांदेकर(वय-५१) नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, पद्माकर नांदेकर हा कफ परेड रहिवासी संघटनेचा अध्यक्ष आहे. एका 19 वर्षीय ब्राझिल देशाच्या विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री अटक केली. पीडित विद्यार्थिनी युवा विनिमय कार्यक्रमांतर्गत(youth exchange programme) भारतात आली होती. नांदेकर कुटुंबासोबत ती सहा महिने वास्तव्यास होती, पण यावर्षी मार्च महिन्यात ती दुसऱ्या कुटुंबासोबत वांद्रे येथे राहण्यास गेली. ओळख असल्यामुळे 15 एप्रिल रोजी नांदेकरने तरुणीला फोन करुन एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले. ‘त्यावेळी शीतपेयामध्ये गुंगीचं औषध मिसळण्यात आलं होतं, आणि माझी शुद्ध हरपली. सकाळी उठल्यावर त्याच हॉटेलच्या रुममध्ये होते आणि घडलेला प्रकार लक्षात आला’, असं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर सकाळी उठून ती थेट वांद्र्यात ज्यांच्याकडे वास्तव्यास होती तेथे गेली, पण तिने घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना सांगितले नाही. त्या कुटुंबियांनी काही दिवसांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर त्यांनी तरुणीला घेऊन सोमवारी थेट कफ परेड पोलीस स्थानक गाठलं आणि तक्रार दाखल केली.

तक्रार उशीराने आली असली तरी एफआयआर दाखल झाल्यानंतर सोमवारी रात्री आम्ही आरोपीला त्याच्या रहात्या घरातून अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.