20 October 2019

News Flash

मुंबईच्या रस्त्यांवरून लवकरच ‘पद्मिनी’ गायब होणार

'पद्मिनी'ची ओळख थोड्याच कालावधीत फक्त फोटोपुरतीच उरणार आहे

मुंबईच्या रस्त्यावरून धावणारी राणी पद्मिनीच्या नावाची टॅक्सी येत्या काही दिवसात कायमची काळाच्या पडद्याआड जाणार आहे. काळी पिवळी टॅक्सी म्हटले की समोर येते ती प्रीमियर पद्मिनी गाडी. ९० च्या दशकात तर मुंबईत ६५ हजार प्रीमियर पद्मिनी टॅक्सी होत्या. मात्र या टॅक्सीचा आता अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. इटालियन फियाट गाडीवरून या गाडीची रचना तयार करण्यात आली होती. मुंबईच्या रस्त्यांवर या गाडीने एकेकाळी राज्य केले. आताच्या घडीला मुंबईत या टॅक्सींची संख्या अवघी ३०० च्या घरात आली आहे.

पद्मिनी टॅक्सी एकेकाळी मुंबईतल्या रस्त्यांची शान होत्या. मुंबई मिरर या वृत्तपत्राने या टॅक्सींसंदर्भातले वृत्त प्रसारित केले आहे. अनेक सिनेमांमधूनही आपण या दिमाखदार टॅक्सींची झलक पाहिली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या अर्थकारणातही या टॅक्सीचा मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. खरेतर या टॅक्सी भंगारात काढण्याचा निर्णय रस्ते आणि वाहतूक विभागातर्फे कधीच २०१३ मध्येच झाला आहे. २० वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या या टॅक्सीना नवा परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या टॅक्सींच्या परवान्याची मुदत संपलेली नाही अशाच काही पद्मिनी टॅक्सी मुंबईतल्या रस्त्यांवर अजून धावत आहेत. मात्र त्या लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहेत. तसेच या टॅक्सींची जागा आता अनेक आरामदायी टॅक्सींनी घेतली आहे. त्यामुळे या टॅक्सीला पूर्वीसारखी पसंती नाहीये. असे असले तरीही मुंबईतल्या रस्त्यांवर सर्वाधिक काळ राहिलेली ही टॅक्सी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

१९६० ते ८० या कालावधीत मुंबईत मोठ्या प्रमाणावर अँबेसेडर टॅक्सी धावत असत.या टॅक्सी आकाराने मोठ्या आणि जास्त आसन क्षमता असलेल्या होत्या. तसेच रस्त्यावर धावताना  ही अँबेसेडर टॅक्सी काहीशी बेढब दिसे. या टॅक्सीला टक्कर देण्यासाठी मुंबईतल्या रस्त्यांवर प्रीमियर पद्मिनी टॅक्सी आणली गेली. या कारचा लुक अँबेसेडरच्या तुलनेत अत्यंत देखणा होता. इतकेच नाही तर या टॅक्सीत बसून प्रवास करणे हे मुंबईकरांना एकेकाळी श्रीमंतीचे लक्षण वाटत असे. मात्र काळ बदलला, मुंबईतल्या रस्त्यांवर धावणाऱ्या टॅक्सीच्या गरजाही बदलल्या. तसेच अनेक खासगी टॅक्सीही रस्त्यावर धावू लागल्या. या सगळ्यामुळे आता पद्मिनी टॅक्सी मुंबईकरांना इतर टॅक्सींच्या तुलनेत आवडत नाही. तसेच या टॅक्सीच्या परवान्यांची मुदतही संपत आली आहे. त्याचमुळे एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या या टॅक्सी आता मुंबईच्या रस्त्यांचा कायमचा निरोप घेणार आहेत. एखाद्या फोटोत दाखवून ही मुंबईकरांची पद्मिनी टॅक्सी एवढे सांगण्यापुरतीच या टॅक्सींची ओळख उरणार आहे.

First Published on June 14, 2017 6:28 pm

Web Title: padmini taxis near the end of the mumbai roads