संस्थांना सहभागी होण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबईतील वाहनतळ समस्येवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उपाय शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई महापालिकेने आता गृहनिर्माण संस्थांच्या आवारात सशुल्क वाहनतळ सुविधा सुरू करण्याची योजना आखली आहे. खासगी गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील वाहनतळाच्या जागा दिवसभर मोकळ्या असतात. या जागेवर बाहेरील वाहनांना सशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार आहे. या योजनेत समाविष्ट होण्याकरिता पालिकेने सोसायटय़ांना आवाहन केले आहे. यामुळे सोसायटय़ांना महसूल मिळणार असला तरी बाहेरील वाहनांना आपल्या आवारात प्रवेश देताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

अनेकदा बाहेरून येणाऱ्या गाडय़ांना वाहन उभे करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे ही वाहने रस्त्यालगत उभी केली जातात. परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडी होती.  तसेच अनधिकृतपणे वाहन उभे केल्याबद्दल वाहनचालकांना दंडही होतो. मात्र वाहने उभी करण्यासाठी पुरेसे वाहनतळ उपलब्ध नाहीत. यावर उपाय म्हणून पालिकेने खासगी निवासी सोसायटय़ांमधील गाडय़ा उभ्या करण्याच्या जागा लोकांसाठी खुल्या करण्याचा पर्याय पुढे आणला आहे. यामुळे खासगी वाहनांना अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध होण्यासोबतच सोसायटय़ांनादेखील उत्पन्न मिळू शकेल. योजनेत सहभागी होण्यासाठी सोसायटय़ांना पालिकेकडे नोंदणी करावी लागेल. यासाठी महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या साहाय्यक आयुक्तांनी निवासी सोसायटय़ांच्या बैठका घ्याव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

पार्किंग पूल

पालिकेच्या ‘वाहनतळ प्राधिकरणा’मार्फत मुंबईतील  वाहनतळांच्या जागांची माहिती गोळा केली जात आहे. भविष्यात वाहनचालकांना मोबाइलवरून रिक्त वाहनतळांची माहिती सहज उपलब्ध व्हावी याकरिता पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

निवासी इमारती वा सोसायटय़ांमधील वाहनतळाच्या दिवसा रिकाम्या असणाऱ्या जागांची माहिती घेऊन ‘पार्किंग पूल’ तयार करण्यात येत आहे. इच्छुक सोसायटय़ांना त्यांच्या वाहनतळांमध्ये दिवसा मोकळ्या असणाऱ्या जागा खासगी वाहनांना भाडय़ाने देता येईल.

सोसायटय़ांनी पालिकेकडे नोंदणी केल्यास उपलब्ध वाहनतळ जागांची माहिती महापालिकेच्या ‘टउॅट 24 ७ 7’ या अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे वाहनचालकाला वाहनतळ शोधणे सोपे होईल.