प्रत्येक स्थानकावरील एका स्वच्छतागृहासाठी शुल्क आकारणी

मध्य रेल्वेने आपल्या स्थानकांवर मुतारीसाठी एक रुपया शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यावर आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानेही मुख्यालयाकडे सशुल्क मुतारीसाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार पश्चिम रेल्वेच्या सर्व उपनगरीय स्थानकांवरील एका स्वच्छतागृहातील मुतारीच्या वापरासाठी एक रुपया शुल्क आकारण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास स्थानकांवरील दोनपैकी एक स्वच्छतागृह नि:शुल्क आणि एक सशुल्क असेल.

रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारांकडे सोपवण्यात आली आहे. या स्थानकांमधील शौचकुपांसाठी पाच रुपये आकारले जातात आणि मुतारी नि:शुल्क असते. या स्वच्छतागृहांमधून कंत्राटदारांना काहीच उत्पन्न मिळत नसल्याने कंत्राटदारांकडून स्वच्छता राखली जात नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. त्यामुळेच आता पुरुषांसाठीच्या मुतारीच्या वापरासाठी एक रुपया शुल्क आकारण्याचा निर्णय मध्य रेल्वेवर घेण्यात आला. या निर्णयावर टीका झाल्यानंतही मध्य रेल्वेने हा निर्णय कायम ठेवला.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने आता उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या वापरासाठी एक रुपया शुल्क आकारणी करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचे पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. याआधीही हा प्रस्ताव आला होता. मात्र लेखा परीक्षण विभागाने तो पुन्हा मुंबई विभागाकडे पाठवून दिला. आता हा प्रस्ताव नव्याने तयार असून त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

या प्रस्तावानुसार पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील दोनपैकी एका स्वच्छतागृहात कंत्राटदाराला शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे. दुसरे स्वच्छतागृह नि:शुल्क राहणार असून प्रवाशांना निवडीचे स्वातंत्र्य असेल. प्रवाशांची कोणतीही गैरसोय न होता कंत्राटदारालाही या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी पैसे सुटतील, हा विचार यामागे असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.