26 January 2021

News Flash

वेदना ही साहित्याची प्रेरणा

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रतिपादन

(संग्रहित छायाचित्र)

‘साहित्य हे जीवनोत्सुक असते. माणसाच्या जीवनातील वेदना त्यात उतरते. वेदना माणसाला अंतर्मुख करते. दलित साहित्याला अंकुर फुटू लागले, कारण दलित समाजाच्या भोगांचे चित्रण त्यात आले आहे. वेदना ही साहित्याची प्रेरणा आहे’, असे प्रतिपादन ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले. ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात शनिवारी ते बोलत होते. फादर दिब्रिटो यांच्या हस्ते ‘साहित्य’ या विशेषांकाचे आणि ‘आषाढी’ या अक्षर साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. ‘साहित्य’चा अंक रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्यावर आधारित आहे. या सोहळ्याला साहित्य संघाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते.

फादर दिब्रिटो यांनी फादर थॉमस स्टिफन्स यांच्या ४०० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले. ‘‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’, असे म्हटले जाते. मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने हा धर्म वाढवण्याचे काम केले ते फादर थॉमस स्टिफन्स अंधारात राहिले. फादर स्टिफन्स ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने महाराष्ट्रात आले होते. मात्र ते इथल्या धर्म, संस्कृती, भाषेशी एकरूप झाले. त्यांनी मराठीतून ‘ख्रिस्तपुराण’ ग्रंथ लिहिला. ख्रिस्ती-हिंदू बंधू आहेत हे त्यांनी ४०० वर्षांपूर्वी सांगितले. आपण एकमेकांना जाणून घेत नाही. एकमेकांमध्ये मिसळत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होतात. आपला साधनेचा धर्म कोणताही असला तरीही आपण धर्मा-धर्मामध्ये सेतू बांधला पाहिजे’’, असे फादर दिब्रिटो म्हणाले.

‘‘साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक साहित्यिकांसाठी क्लेशदायक असते. एका साहित्यिकाला हरवून दुसरा साहित्यिक जिंकतो, हे मी अनुभवले आहे. त्यामुळे फादर दिब्रिटो यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली याचा आनंद आहे’’, असे मधु मंगेश कर्णिक म्हणाले. भाषा, साहित्य, नाटय़, सामाजिक कार्य या क्षेत्रांत काम करणाऱ्या नऊ व्यक्तींचा वर्धापन दिन सोहळ्यात ‘साहित्य सेवा गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2019 1:47 am

Web Title: pain is the inspiration of literature abn 97
Next Stories
1 मोहीम संपली, खड्डे दुरुस्तीही थंडावली
2 दोनतृतीयांश आमदार फुटले, तरच पक्षांतर ग्राह्य
3 शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आमदारांचा दबाव
Just Now!
X