छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पूल कोसळून पाच जण ठार झाले तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेचे अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जे या घटनेत जखमी झाले आहेत, त्यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थनाही मी इश्वरचरणी करतो असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या संदर्भातलं एक ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत तर जखमींना ५० हजारांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. रूग्णालयात उपचार सुरु असलेल्या रूग्णांचे उपचारही राज्य सरकारतर्फे केले जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी असलेल्या टाइम्स ऑफ इंडिया इमारतीशेजारी जो पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत एकूण पाच जण ठार तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह खासदारांनीही भेट दिली. जखमी रूग्णांचा सगळा खर्च सरकार करणार असल्याचं विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे.