शीव रुग्णालयात ‘हायपेक’ उपकरणाचा वापर; गरीब रुग्णांनाही लाभ मिळण्याची शक्यता
कर्करोगाचा रुग्णाला सर्वाधिक त्रासदायक आणि खर्चीक ठरणाऱ्या केमोथेरपीवर पर्याय म्हणून लोकमान्य टिळक म्युनिसिपल वैद्यकीय (शीव) रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘हीटेड इंट्रापेरिटोनेल केमोथेरपी’(हायपेक) नावाच्या उपकरणाचा वापर सुरू केला आहे. या उपकरणामुळे रुग्णाला कराव्या लागणाऱ्या केमोथेरपीची संख्या कमी होते, याचबरोबर त्या प्रत्येक केमोथेरपीसाठी लागणारा खर्चही कमी होऊ शकतो.
‘हायपेक’ नावाच्या उपकरणाद्वारे केल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीत प्रथम शस्त्रक्रियेने रुग्णाच्या शरीरातील कर्करोगाची गाठ काढली जाते. यानंतर उपकरणाच्या साहाय्याने केमोथेरपीसदृश उपचार केले जातात. यामुळे भविष्यात त्या रुग्णाला केमोथेरपी करण्याची गरज भासणार नाही. ही पद्धत फक्त गाठ काढलेल्या भागापुरती मर्यादित असल्याने संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होत नाही. ही उपचार पद्धती मुख्यत: स्त्रियांच्या ओटीपोटातील कर्करोगाच्या गाठीसाठी केली जाते.
हे उपकरण महाराष्ट्रात आणण्यासाठी ‘लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालया’तील शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. सेथाना यांचा पुढाकार होता. डॉ. सेथाना प्रशिक्षणासाठी वॉशिंग्टन येथे गेले असताना त्यांना या उपकरणाबद्दल माहिती मिळाली आणि हायपेक उपकरणाचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो या जाणिवेतून हे उपकरण रुग्णालयात आणण्यात आले. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत डोनरच्या आर्थिक साहाय्यातून पाच रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. मात्र या उपचार पद्धतीसाठी साधारण एक ते दीड लाखांचा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य कुटुंबीयांना परवडणार नाही, त्यामुळे ‘लोकमान्य टिळक रुग्णालया’ने हायपेक उपचार पद्धती शासनाच्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’अंतर्गत घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ‘हायपेक’ उपकरणासाठी लागणारा २० लाखांचा खर्च ‘संडे फ्रेंडर्स’ या रुग्णालयाला वैद्यकीय मदत पुरविणाऱ्या गटाने केला आहे.