चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’च्या बहुप्रतिक्षित ‘गायतोंडे’ या ग्रंथाचे प्रकाशन मुंबईत ३० जानेवारीला प्रख्यात शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्या हस्ते होणार आहे.
गेली सात-आठ वर्षे या ग्रंथाच्या जुळवाजुळवीसाठी ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक प्रयत्न करीत होते. गायतोंडे यांच्या चित्रकारकीर्द आणि जीवनाचा आढावा घेणारा हा ग्रंथ अखेर प्रकाशनासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकेतील ‘गुगेनहेम म्युझियम’तर्फे जगातील चार शहरांत गायतोंडे यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन भरवण्यात आले होते. यातून जगभरातील कलारसिक आणि समीक्षकांना गायतोंडे यांच्या चित्रांचा आस्वाद आणि मूल्यमापनाची संधी मिळाली होती. तसेच ‘ख्रिस्तीज’ या संस्थेतर्फे गेल्या काही दिवसांत झालेल्या लिलावांमध्ये गायतोंडे यांच्या चित्रांना विक्रमी किंमत मिळाल्यानंतर सर्वाचेच लक्ष गायतोंडे यांच्याकडे नव्याने वेधले गेले. या पाश्र्वभूमीवर प्रकाशित होत असलेल्या ‘ए-फोर’ आकारातील, आर्ट पेपरवरील रंगीत छपाई असणाऱ्या २४० पानी ग्रंथांत समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ, प्रफुल्ला डहाणूकर, फिरोझ रानडे, नितिन दादरावाला अशा अनेक मान्यवरांचे गायतोंडे यांच्यावरील लेख आहेत. चित्रकार प्रभाकर कोलते यांची प्रस्तावना ग्रंथाला असून गायतोंडे यांची ६५ चित्रे व ४८ छायाचित्रांचाही समावेश आहे.

जनआवृत्तीही..
‘चिन्ह’ने ‘गायतोंडे’ या मूळ ग्रंथाची जनआवृत्ती काढण्याचे ठरवले आहे. चित्रकार, विद्यार्थी, कलारसिक अशा सर्वाच्या संग्रही असावा अशा या मूळ ग्रंथाच्या जनआवृत्तीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मूळ २४० पानांच्या ग्रंथाची जनआवृत्ती १८० पानी असणार आहे. यात मूळ ग्रंथातील गायतोंडे यांची छायाचित्रे नसतील. पण त्यांची बारा चित्रे रंगीत स्वरुपातच छापली जाणार आहेत. मूळ ग्रंथातील सर्व मजकूर या जनआवृत्तीत समाविष्ट केला जाणार आहे. या आवृत्तीला विशेष प्रस्तावनादेखील लिहिली जाणार आहे. ही जनआवृत्ती प्रकाशनपूर्व सवलतीत ३५० रुपयांमध्ये घरपोच मिळणार आहे. जनआवृत्तीचेही प्रकाशन मूळ ग्रंथासोबत करण्यात येणार आहे. संपर्क – ९००४०३४९०३.