News Flash

गॅलऱ्यांचा फेरा : कलागुरूचे दृश्यस्मरण..

शंकर पळशीकर हे सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) म्हणून १९७५ साली निवृत्त झाले.

शंकर पळशीकर हे सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) म्हणून १९७५ साली निवृत्त झाले. दिवंगत अमूर्तकार वासुदेव गायतोंडे, प्रफुल्ला डहाणूकर, आजचे ज्येष्ठ अमूर्तचित्रकार प्रभाकर कोलते, यांच्यापासून ते आज साठीच्या आतबाहेर असलेले अनेक चित्रकार हे पळशीकरांचे विद्यार्थी होते. पण केवळ तेवढय़ाच मर्यादित अर्थाने ते ‘कलागुरू’ नव्हते.. सन १९८४ मध्ये पळशीकर सर गेले; तरी त्यांचं लिखाण आणि त्यांचा चित्र-ठेवा आजही अनेकांना प्रेरक ठरू शकतो.. हे किती खरं आहे, याचा प्रत्यय घेण्यासाठी मुंबईत रीगल सिनेमाच्या चौकातल्या, एल्फिन्स्टन कॉलेजशेजारच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’त (एनजीएमए) जायलाच हवं! समजा प्रेरणा नकोच असेल, चित्रं पाहून बरं वाटावं एवढाच उद्देश असेल तरीही जायला हवंच.. इथल्या चार मोठय़ा मजल्यांवर (तळ+३) भरलेल्या प्रदर्शनातून आनंद तर मिळेलच; पण कदाचित चित्रकलेच्या विविध शैलींबद्दल विचार करण्याची संधीही मिळेल. यंदाचं वर्ष हे शंकर पळशीकरांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या निमित्त हे प्रदर्शन भरलं आहे.

प्रदर्शनाच्या तळमजल्यावर, अगदी पहिलंच चित्र १९४३ सालचं आहे : ‘जेजे’मध्ये १९४२ ते ४७ या काळात पळशीकर शिकत होते, तेव्हा जगन्नाथ अहिवासी, वाय. के. शुक्ला यांचा ‘भारतीय शैली’चा वर्ग चालत असे. त्या शैलीची चित्रं पळशीकरांनी विद्यार्थिदशेत केली, तरीदेखील हे पहिलं चित्र जरा निराळं आहे.. सपाट रंगांची पाश्र्वभूमी, हे अशा चित्रांचं वैशिष्टय़ या चित्रात अगदी कमी आहे; कारण हे चित्र अगदी भरगच्च म्हणावं असं आहे. अगदी खालच्या भागात (हाच भाग दर्शनी किंवा फोरग्राऊंडसारखा आहे) लेणी दिसतात. त्यांतल्या मूर्तीची रंग व ब्रशानेच रेखाटनं आहेत. चित्रात अगदी मागे, भगवी पताका कळसावर असलेलं मंदिर आहे. बौद्धकाळापासून आजवरचा प्रवास सूचित व्हावा, असंच हे चित्र आहे. बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांची अशी दोन मोठी चित्रंदेखील इथे आहेत. ‘जेजे’तून बाहेर पडल्यावर, १९४९ मध्ये पळशीकरांनी केलेल्या ‘क्रूसेड ऑफ फ्रीडम’ या चित्रात बौद्धकालीन ते आदिवासी चित्रशैलींचा संगम आहे. या चित्रात मध्यभागी येशूसारखी, तर अगदी वर गौतम बुद्धासारखी आकृती दिसते. ‘ई इज इक्वल टु एम-सी-स्क्वेअर’ या आइनस्टाइनच्या ऊर्जावेधी सूत्राचे नाव असलेलं चित्र (१९८३), ‘कलर ऑफ साऊंड’ हे ध्वनि-रंगाच्या (मुळातच अमूर्त) विचाराचं १९७१ सालचं मोठं चित्र, अशी गाजलेली अमूर्तचित्रं याच भागात आहेत आणि मुंबईच्या कलाक्षेत्राचे एक आधारस्तंभ- गॅलरीचालक केकू गांधी यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेसाठी केलेले ‘सिनर्स डिव्हाइन’ (१९५०) किंवा ‘पोट्र्रेट ऑफ मिस के’ (१९५२) अशी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या कायम संग्रहातली चित्रंही इथं आहेत. पण तुलनेनं नजर जाणार नाही असं, तरीही अत्यंत महत्त्वाचं एक चित्रही याच मजल्यावर आहे.. ते चित्र म्हणजे, १९५० सालचं ‘माया’! त्याबद्दल नंतर बोलूच..

पहिल्या मजल्यावर पळशीकरांचा इतिहास समजतो! इंग्रजीत भरपूर लिखाण असलेले फलक इथं आहेत, पण हे इंग्रजी सोपं आहे आणि माहितीदेखील आवश्यक तेवढीच आहे. पळशीकरांची कारकीर्द अध्यापक आणि चित्रकार अशी दुहेरी होती. त्या दोन्ही भूमिकांतले त्यांचे फोटोही आहेत. कविता आणि अल्पाक्षरी गद्य यांच्या मधले लिखाण पळशीकरांनी केलं, त्यापैकी काही या प्रदर्शनात मूळ मराठीतच वाचता येईल.

दुसरा मजला आहे ‘व्यक्तिचित्रणकार’ पळशीकरांचा! याच मजल्याच्या काही भागांत त्यांनी केलेली रेखाटनं आहेत. अगदी एका कोपऱ्यात तर, १९६८ सालचं त्यांच्या ‘पहिल्या काही अमूर्तचित्रांपैकी’ ठरावं, असं ‘क्लीं’ हे चित्रही आहे. व्यक्तिचित्रांपैकी, बंधू आणि अभिनेते नाना पळशीकर (१९५६ सालचं चित्र), पॉल कोळी (१९७०) व प्रभाकर कोलते (१९७४), ही चित्रं स्वान्तसुखाय केलेली आहेत. प्रकाशक विष्णू भागवत किंवा नाटककार विष्णुदास भावे यांची चित्रं ही सार्वजनिक जागांसाठी केल्यामुळे असेल बहुधा; पण जरा उजळ रंगांत आहेत. या दालनाच्या मधोमध एक काळसर चित्र आहे : ‘गोवन लाइफ’ (१९८३). प्रथमदर्शनी फोटोची निगेटिव्ह दिसते, तसं.. पण अंधारात मनुष्याकृती पाहिल्यासारखं स्पष्ट होत जाणारं!

तिसरा मजला हा शैलीविचार करणाऱ्यांनी अवश्य पाहावा, असा आहे. इथंही पुन्हा यथातथ्यवादी आणि अहिवासीप्रणीत ‘भारतीय शैली’ यांतली चित्रं आहेत, मध्येच एक जरा अधिक अलंकारिक असं ‘दिक्काल’ हे दिशा आणि काळ या दाम्पत्याचं चित्र आहे. ‘दिक्काल’मध्ये अलंकरण आणि विचार यांची सांगड असली, तरी तितकी अलंकारिक चित्रपद्धत पळशीकरांनी फार कमी वेळा वापरली. मधल्या भिंतीवर आधी एकरंगीच वाटणारी- उठावातून आकाराचा परिणाम साधणारी अशी दोन चित्रं (१९७१-७२) आहेत, ती आवर्जून पाहावीत, कारण अमूर्तीकरणाकडे जाताना झालेल्या प्रवासातले टप्पे ठरावीत, अशी ती दोन चित्रं आहेत.

भारतीय अमूर्तचित्रांवर ‘पाश्चात्त्यधार्जिणे’ असा आरोप होतो.. तो खरा नसून ‘आधुनिक भारतीय अमूर्तचित्रां’ना देखील काहीएक पूर्वप्रक्रिया होती, त्यामागे प्रयोग होते आणि विचार होता, हे या प्रदर्शनातून आपसूकच सिद्ध होईल. ‘माया’ हे चित्र त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ते पाहून प्रथमदर्शनी पिकासोचा क्युबिस्ट विचार आठवला, तरी ‘माया’ ही पळशीकरांनी अरूप-अमूर्ताकडे जाण्याची एक प्रकारे पहिली पायरीच आहे. त्यानंतरची बीजाक्षरांची (क्लीं, श्रीं आदी) चित्रं आणि त्याहीनंतर १९७४ सालचं ‘फ्रीडम’ हे चित्र आणि मग ‘ई इज इक्वल टु एम-सी-स्क्वेअर’मधला ‘पार्टिकल’ परिणामाचा साक्षात् अनुभव, असा प्रवास पळशीकरांनी केला. त्यात मध्ये मध्ये मनुष्यचित्रंही केली.

अनेक शैलीवैशिष्टय़ं एकाच वेळी अंगी बाणलेली असणं, यातून पळशीकरांमधला शिक्षक दिसून येतो. मात्र चित्रकार पळशीकरांची साथ अध्यापक पळशीकरांना नेहमीच होती, हेच हे प्रदर्शन सांगतं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:38 am

Web Title: painting exhibition on occasion of birth centenary of shankar palshikar
Next Stories
1 सहज सफर : निसर्गसौंदर्याची उधळण!
2 कर्जहप्ता भरण्यास आणखी मुदतवाढ
3 सरकारी कर्मचाऱ्याचा गोपनीय अहवाल आता सामान्यांच्या ‘हातात’!
Just Now!
X