सरबजितचा बळी नियतीने घेतला नाही तर पाकिस्तान सरकारने घेतला, असे मत त्याच्याबरोबर तुरूंगात असलेल्या व नुकत्याच सुटून आलेल्या एका माजी कैद्याने अहमदनगर येथून पीटीआयशी बोलताना व्यक्त केले. ‘सरबजितला नेहमी घरची आठवण येत होती, तो भारतात परत येण्यास उत्सुक होता’, असे अहमदनगरचे भानुदास कारळे यांनी सांगितले. ते गेल्यावर्षी पंधरा जूनला लाहोर येथील कोट लखपत तुरूंगातून सुटून भारतात आले आहेत. कारळे यांना २८ ऑगस्ट  २०१० रोजी पाकिस्तानी प्रदेशात गेल्याने अटक करण्यात आली होती. ‘‘सरबजित दयाळू होता. भारतीयच नव्हे तर पाकिस्तानी कैद्यांशीही तो चांगला वागत होता पण पाकिस्तानी कैदी नेहमी आम्हाला त्रास द्यायचे,’’ असे कारळे यांनी सांगितले
‘‘सरबजितच्या मृत्यूचे वृत्त ऐकून धक्का बसला. सरबजितला जिथे ठेवले तिथेच आपणही तुरूंगवासात होतो. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याला हेर समजून त्याच्यावर बरेच र्निबध लादले होते. सरबजितचा मृत्यू हा नियतीचा वगैरे भाग नाही, पण पाकिस्तानी सरकारने त्याचा बळी घेतला. जेव्हा आमची काही जणांची सुटका झाली तेव्हा सरबजितला आनंद झाला. तो भारतात येण्यास इच्छुक होता. खरेतर त्याला आमच्याआधी सोडायला पाहिजे. पण ते झाले नाही.  भारत सरकार व पाकिस्तानी अधिकाऱ्यांमधील संपर्काच्या अभावामुळे त्याचा बळी गेला’, असे कारळे यांनी सांगितले