मनोहर पर्रिकर यांचे प्रतिपादन; ‘आयएनएस चेन्नई’ विनाशिका नौदलात दाखल

सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाणे अपेक्षितच होते. त्यामागे त्यांचे स्थानिक व लष्करी राजकारणच आहे. भारत आक्रमक असणार नाही, पण कुणी आक्रमक झाल्यास आम्ही ते निमूटपणे सहनही करणार नाही! हा संदेश द्यायचा होता, तो आपण दिला व पोहोचलादेखील आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी येथे केले.

‘आयएनएस चेन्नई’ ही ‘प्रकल्प १५ए’मधील अखेरची विनाशिका सोमवारी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते समारंभपूर्वक भारतीय नौदलात दाखल झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक ही धडक आणि अनपेक्षित कारवाई होती. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. गेल्या अनेक वर्षांतील पाकिस्तानचे वागणे आता आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे शस्त्रसंधीच्या उल्लंघनामागे अनपेक्षित काहीही नाही. पाकिस्तानकडून होणाऱ्या या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामागे त्यांचे स्थानिक व लष्करी राजकारणाचे गणित आहे. सीमेवरील तापलेले वातावरण आता काहीसे थंडावले आहे. येत्या काही काळात ते अधिक थंडावणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

‘आयएनएस चेन्नई’ ही कोलकाता वर्गातील सर्वात अद्ययावत अशी तिसरी विनाशिका असून मुंंबईच्या माझगाव गोदीमध्येच तिची बांधणी झाली आहे. ही १६३ मीटर्स लांबीची आणि तब्बल साडेसात हजार टन वजनाची विनाशिका असून नव्याने विकसित करण्यात आलेली, शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणारी ‘कवच’ यंत्रणा हे या विनाशिकेचे खास वैशिष्टय़ आहे. अशा प्रकारचे ‘कवच’ धारण करणारी ही नौदलातील पहिलीच युद्धनौका आहे.

नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा आपल्या भाषणात म्हणाले की, ‘आयएनएस चेन्नई’ म्हणजे स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने पडलेले भारतीय नौदलाचे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर स्वयंपूर्ण बनावट इतर कोणत्याही युद्धनौकेत नाही.

शिवाय यामध्ये भारतातील अनेक उद्योग एकत्र आले असून हे पंतप्रधानांनी मांडलेल्या ‘मेक इन इंडिया’चेच महत्त्वाचे प्रतीक आहे.  माझगाव गोदीचे व्यवस्थापकीय संचालक रिअर अ‍ॅडमिरल श्रावत म्हणाले की, माझगाव गोदीने बांधणी केलेली ही २६ वी युद्धनौका आहे. सध्या प्रत्येक युद्धनौकेगणिक स्वयंपूर्णतेत १० टक्के वाढ होत आहे. या युद्धनौकेच्या बांधणीत १५ राज्यांमधील उद्योग गुंतलेले होते. माझगाव गोदीच्या कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. त्यानंतर नौदलातील समावेशासंदर्भात जारी केलेले आदेश युद्धनौकेचे नेतृत्व करणारे कॅप्टन सीआर प्रवीण नायर यांनी वाचून दाखविले आणि नौदल ध्वजाच्या आरोहण व राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.

चंदू चव्हाण सुरक्षित

सर्जिकल स्ट्राइकनंतरच्या दिवसभरात नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचलेले ३७ राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे. चव्हाण सुरक्षित असून दोन्ही देशांचे लष्करी कारवायांचे महासंचालक एकमेकांशी संपर्कात आहेत. परिस्थिती पूर्ववत होताच चव्हाण यांना परत आणण्यात यश येईल, असेही संरक्षणमंत्री एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

स्वयंपूर्णतेचा प्रश्न सुटेल

स्वयंपूर्णतेच्या पातळीवर गेल्या दोन वर्षांत आपण अनेक आघाडय़ांवर यशस्वी झालो असून आपल्याकडील स्वयंपूर्ण बनावटीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. आपल्याला हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत न्यायचे आहे. येणाऱ्या काळात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व संशोधन विभाग यांनी पूर्ण क्षमतेने काम केल्यास येत्या काही वर्षांत आपल्याला पूर्णपणे बनावटीचे उद्दिष्ट सहज पार करता येईल, असे सांगून संरक्षणमंत्री म्हणाले की, कमी वजनाच्या लढाऊ विमानाचा (एलसीए) ५० हजार कोटींचा प्रकल्प व्यवस्थित सुरू आहे.

[jwplayer zkvFlBpu-1o30kmL6]