जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचे वार्ताकन करताना पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारतविरोधी गरळ ओकली आहे. भारत कायमच पाकविरोधी कांगावा करत असल्याचे बहुतांशी माध्यमांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी हल्लेखोरांचा उल्लेख टेररिस्ट असा न करता मिलिटंट असा करण्याचा खोडसाळपणा केला आहे. त्यातून हल्लेखोर भारतातीलच असंतुष्ट घटक असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न आहे. ‘द न्यूज इंटरनॅशनल’ या वर्तमानपत्राने म्हटले आहे की, भारताने हा पुन्हा पठाणकोट हल्लयासारखाच बनाव रचला आहे. स्वत: हल्ला घडवून पाकिस्तानला बदनाम केले जात आहे. लष्करी तुकडीचे मुख्यालय जाणूनबुजून निवडले होते. भारतीय लष्करात पंजाबींची संख्या अधिक आहे आणि त्यातून पंजाबी जनमत पाकिस्तानविरुद्ध भडकवता येईल. काश्मीर प्रश्नावर पंजाबींचे समर्थम मिळवता येईल.

‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने म्हटले आहे की भारत वस्तुस्थितीचा अभ्यास न करता उतावीळपणे निष्कर्ष काढून कृतीसाठी सरसावतो आहे. या वृत्तपत्राने पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांचे ट्वीट छापले आहे. आझादीचा संघर्ष आणि पाकिस्तानची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारतातीलच काही घटकांनी हे कृत्य केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान या अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचाही उल्लेख त्यांच्या मुख्य बातमीत आहे. ‘द पाकिस्तान ऑब्झव्‍‌र्हर’च्या वृत्तात भारताचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानमधील आघाडीच्या वृत्तपत्रानेही राजनाथ सिंग यांचा प्रचार म्हणजे जहरी किंवा विषारी हल्ला असल्याचे म्हटले आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या आरोपांमुळे दोन्ही देशांतील संबंध धोकादायक बनल्याचा उल्लेख त्यांच्या संपादकीय पानावर आहे.