विरारमधील सभेत योगी आदित्यनाथ यांची शिवसेनेवर टीका

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. शिवसेनेची वर्तमान परिस्थिती पाहून सर्वात जास्त दु:ख बाळासाहोबांच्या आत्म्याला होत असेल, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आदित्यनाथ यांची विरार येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. एकही भारतीय असा नाही, ज्याच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर नाही. बाळासाहेबांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. त्यांनी नेहमी समोरून लढत दिली. समाजात फूट पाडणाऱ्यांचा आणि राष्ट्राला कमकुवत करणाऱ्यांचा बुरखा फाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांनी सुरू केलेली परंपरा कमजोर होत असताना पाहून त्यांच्या आत्म्याला प्रचंड दु:ख होत असेल. असे योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले.

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या परिवाराला तोडून जबरदस्तीने उमेदवारी देण्याची आवश्यकता नव्हती. हा भाजपचा अंतर्गत मामला होता आणि भाजपने वनगा परिवाराचा योग्य तो सन्मानही केला असता, परंतु  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक काम केले जात असल्याचा आरोप योगी यांनी यावेळी केला.   बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे नाव न घेता त्यांच्यावरही योगी यांनी टीकास्त्र सोडले.

सभेनंतर गोंधळ

आदित्यनाथ यांच्या सभेनंतर गोंधळ झाला. योगी सभेनंतर निघून गेल्यानंतर काही कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला.