कॅप्टन यादव यांच्याशी सरकारचा ३५ हजार कोटींचा करार

पहिले भारतीय बनावटीचे विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांच्या थर्स्ट एअरक्राफ्ट प्रा. ली. या कंपनीबरोबर राज्य सरकारने आज देशांतर्गत विमान निर्मितीबाबतचा सामंजस्य करार केला. वांद्रे- कुर्ला संकुलात सुरू असलेल्या पहिल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणुकदारांच्या परिषदेत आज यादव आणि राज्य सरकार यांच्या सुमारे ३५  हजार कोटी रुपयांचा हा करार झाला असून या करारानुसार पालघर इथे १९ आसनी विमाननिर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी राज्य सरकार  यादव यांना लवकरच जमीन उपलब्ध करून देणार आहे.

फेब्रुवारी २०१६ मध्ये  याच वांद्रे-  कुर्ला संकुलावर  भरलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात कॅप्टन अमोल यादव यांनी आपले सहा आसनी विमान प्रदर्शित केले होते. या विमानाला मेक इन इंडिया सप्ताहात चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सरकारच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि थर्स्ट एअरक्राफ्ट प्रा. ली. यांच्यात हा करार झाला. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, थर्स्ट एअक्राफ्ट कंपनीतर्फे कॅप्टन अमोल यादव, कंपनीचे संचालक रश्मीकांत यादव उपस्थित होते.  यादव यांनी पहिले सहा आसनी विमान मुंबईतील चारकोप इथल्या आपल्या इमारतीच्या गच्चीवर तयार केले होते. हे विमान बनवण्यासाठी त्यांना जागेबरोबरच अन्य आर्थिक अडचणी आल्या होत्या. मात्र या सगळ्यावर मात करत त्यांनी पहिले भारतीय बनावटीचे विमान तयार केले. हे विमान डीजीसीए अर्थात केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाकडे नोंदणी करण्यासाठीही त्यांना अनेक अडचणी आल्या होत्या.मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर भारतीय बनावटीच्या या पहिल्या विमानाची नोंदणी झाली असून  या यशानंतर यादव यांनी आता १९ आसनी विमान बनवण्याचे काम सुरू केले आहे. आता सरकारने त्यांना पालघर इथे १५७ एक जमीन देण्यासंदर्भात तयारी दर्शवली आहे. जेवढय़ा लवकर आपल्याला ही जागा मिळेल तेवढय़ा लवकर आपण या जागेवर विमान निर्मितीचा कारखाना उभा करू आणि त्यानंतर प्रत्यक्ष १९ आसनी विमान निर्मितीच्या कामाला सुरुवात करू असा विश्वास अमोल यादव यांनी व्यक्त केला.

मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे ‘गरिबांच्या पैश्यांची उधळण’

नंदुरबार : मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील गोरगरीबांच्या पैश्यांची उधळण असून कुठेही रोजगार निर्माण होत नसल्याची टीका राष्टवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. खडसे यांचा तत्काळ राजीनामे घेणारे पारदर्शी मुख्यमंत्री इतर आठ भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे गौडबंगाल काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर २० बुलेट ट्रेन

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील प्रवास वेगवान करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशनने या मार्गावर २० बुलेट ट्रेन चालविण्याचे नियोजन केले आहे. हा मार्ग कार्यान्वित होताच २०२३ सालापर्यंत आठ बुलेट ट्रेन सेवेत येतील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यात १२ ट्रेन दाखल केल्या जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२२ पासून सेवेते येणार आहे. तिचा मुंबई ते अहमदाबाद  या ५०८ किलोमीटर मार्गापैकी ४६० किलोमीटरचा मार्ग उन्नत असणार आहे. सध्या या मार्गावरुन प्रवास करण्यासाठी सात तास लागतात. बुलेट ट्रेनमुळे तोच प्रवास दोन तासांत होईल. बुलेट ट्रेन जास्तीत जास्त प्रतितास ३५० किलोमीटर एवढय़ा वेगाने धावू शकते. मात्र मुंबई ते अहमदाबाद मार्गावर हीच ट्रेन ३२० किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे. हा मार्ग संपूर्णपणे स्वतंत्र असल्याने  जवळपास २० बुलेट ट्रेन चालविण्याचे नियोजन राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशनने केले आहे. २०२३ पर्यंत आठ बुलेट ट्रेन येतील आणि त्यानंतर पुढील १० वर्षांत टप्प्याटप्यात आणखी १२ गाडय़ा दाखल केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा

बुलेट ट्रेन चालविणाऱ्या लोको पायलटच्या केबिनमध्ये स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा असणार आहे. त्यामुळे वेगवान ट्रेन चालविताना पुढील ५० किलोमीटरच्या मार्गात कोणताही अडथळा नाहीना हे स्पष्ट दिसेल. त्यानुसार लोको पायलट वेगावर नियंत्रणही ठेवू शकेल. जर लोको पायलटकडून वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही, तर स्वयंचलित पध्दतीने ही ट्रेन थांबण्यास मदत मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे अपघाताचा धोका नसेल.