शिवसेनेचा प्रतिघात

शिवसेना व भाजप युतीत भाजपने अनेकदा शिवसेनेशी दगाबाजी केली आहे. चिमुर मतदारसंघ शिवसेनेकडे असताना सेनेचे उमेदवार रमेश गजभिये यांना पळवून नेल्यामुळे आम्हाला जागा सोडण्याची वेळ आली होती. शिवसेनेने आता स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका जाहीर केली असून श्रीनिवास वनगा हे भाजप नेत्यांच्या वागणुकीबाबत वेदना व्यक्त करत स्वत:हून मातोश्रीवर आले. भाजपने जे पेरले तेच आता उगवत असून दिवस बदलू लागले आहेत, हे भाजपने आता लक्षात घ्यावे असा प्रतिघात शिवसेनेने केला आहे.

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांची उमेदवारी आज जाहीर केली. यानिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना सेनेचे राजकारण दुर्दैवी असल्याचे सांगितले. पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत सेनेबरोबर चर्चा झाली होती. त्यांना सर्व गोष्टींची कल्पना दिल्यानंतर त्यांनी असे वागावे हे चांगले झाले नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिघात करताना ‘भाजपने जे पेरले तेच आता उगवले’ असे सांगितले. श्रीनिवास वनगा शिवसेनेत आल्यामुळे भाजपला मिरच्या झोंबलेल्या दिसतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर इतके भांबावले होते की ते सतत स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्याऐवजी ‘स्वर्गीय विष्णू सावरा’असेच म्हणत राहिले. कर्नाटकमध्येही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तेथील काँग्रेस सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे सरकार भ्रष्ट असल्याचे सांगत होते. यापूर्वी भाजपने शिवसेनेचे उमेदवार पळवले होते याची मुख्यमंत्र्यांना आठवण का झाली नाही, असा सवाल करत संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भाजपचे मंत्री करताना आणि चिमुरची हक्काची शिवसेनेची जागा पळवताना भाजपला युतीच्या धर्माची आठवण का झाली नाही?

मुख्यमंत्री फडणवीस आज सांगत आहेत की शिवसेनेचे वागणे दुर्दैवी आहे. मग राधेसुता, शिवसेनेचे उमेदवार पळवताना तुझा धर्म कुठे गेला, असा सवाल करत संजय राऊत म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेचे नगरसेवक नाना अंबोले तसेच मुलुंडमध्ये प्रभाकर शिंदे यांना भाजपची उमेदवारी देताना आपल वागणं चुकलं असं मुख्यमंत्र्यांना का वाटलं नाही. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राजेंद्र पटणी यांना फितवून भाजपच्या प्रचाराला जुंपले तेव्हा मुख्यमंत्र्यांचे वागणे हे सत्याच्या धर्माला धरून होते का, असा सवालही संजय राऊत यांनी केला. मुळात ज्या चिंतामण वनगा यांनी काँग्रसच्या राजेंद्र गावित यांचा पराभव केला त्यांनाच वनगा यांच्या जागी उमेदवारी देण्याची वेळ भाजपवर का आली याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असेही राऊत म्हणाले.